पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला. पाच दिवस राबविलेल्या या शिबिरात ३०५ जणांनी लाभ घेतला.
मंत्री धनंजय मुंडे यांचे स्विय सहाय्यक करण जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नामदेव वडमारे व सचिन बडे या दोन तरूणांनी हा उपक्रम राबवला.
फळे, भाजीपाला विक्री, किराणा, चप्पल विक्री अशा विविध व्यावसायासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातील दिव्यांगांनी या उपक्रमाचा फायदा घेतला. असे विजय वडमारे यांनी सांगितले. दरम्यान, मागील वर्षी शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील 40 नागरिकांना ही प्रमाणपत्रे काढून दिली असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे.
ऑनलाईन सुविधा व प्रमाणपत्रासाठी रक्कमही
कोरोना महामारी परिस्थितीचा विचार करता या तरूणांनी व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची सर्व कागदपत्रे ऑनलाईन मागवून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरून घेतले. तसेच संबंधित कार्यालयातून मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी ४० ते ५० रूपयांची मदतही केली. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हजार रूपये घेतात. मात्र, या तरूणांनी दिव्यांगासाठी हि सेवा मोफत दिल्याने त्यांची मोठी आर्थिक बचत झाली.
याबाबत विजय वडमारे म्हणाले की, “दिव्यांग व्यक्तींनी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे. तसेच त्यांना शासकीय योजनांसाठी या कागदपत्रांची गरज असते. त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे स्विय सहाय्यक करण जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा घडते. त्यामुळे मोठे मानसिक समाधान मिळते.”