- पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संकेतस्थळ आणि हेल्पलाईनचे अनावरण
पिंपरी : महिला सक्षमीकरणाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या कुंदा भिसे यांनी पिंपळे सौदागर परिसरात नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या अफाट कार्याने नागरिकदेखील प्रभावित होत आहेत. सामजिक कार्यात नेहमीच त्यांचे एक पाऊल पुढे राहिले आहे. नागरिकांच्या समस्या असो की उत्सव यात हिरीरीने पुढाकार घेऊन सोसायटीतील नागरिकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. नगरसेवक नसताना देखील जनसेवेचा वसा हाती घेऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी त्या कायम झटत आल्या आहेत. त्यांच्या या कार्याला दाद द्यावीच लागेल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा बांधकाम क्षेत्रातील प्रसिध्द उद्योजक शंकर जगताप यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील नागरिकांना समस्या तत्काळ सोडविण्यासाठी अध्यक्षा कुंदा भिसे यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तयार केलेल्या वेबसाईट आणि हेल्पलाईनचे अनावरण शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे, उद्योजक वसंत काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, उद्योजक विजय भिसे, उद्योजक जयनाथ काटे, उद्योजक राजू भिसे, विकास काटे, अतुल पाटील, विशाल वाळके, दिनेश काटे, विजय बांगरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, ‘माझं पिंपळे सौदागर’ या भावनेतून प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर माझा भर असतो. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याला नेहमी प्रथम प्राधान्य असतं. समस्यांचं चोवीस तासात निराकरण झालं पाहिजे, यासाठीच http://kundabhise.com/ हे संकेतस्थळ (Website) आणि +918263810810 हा हेल्पलाईन (Helpline Number) क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या पाण्यापासून ते प्लम्बिंगपर्यंतच्या कोणत्याही समस्या असो, त्या वेबसाईटवर नोंदविताच त्याची दखल घेतली जाईल. त्यासाठी नागरिकांनी संकेतस्थळावर लॉग इन करून अथवा हेल्पलाईनद्वारे उन्नतिशी संपर्क साधायचा आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी त्वरीत प्रयत्न केले जातील, याची हमी मी देते. नागरिकांनी संकेतस्थळास भेट द्यावी. त्यांना माझ्या आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा पहावयास मिळेल. समस्या प्रलंबित न ठेवता त्या सोडविण्यावर मी भर देते आली आहे.
पिंपळे सौदागरमधील नागरिकांसाठी हक्काचे ‘डीजीटल’ व्यासपीठ
उन्नतीच्या माध्यमातून संकेतस्थळ आणि हेल्पलाईनद्वारे नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांचे प्रश्न, त्यांना भेडसावणा-या अडीअडचणी, रखडलेली कामे, प्रलंबित प्रश्न, घरगुती समस्या, सोसायटीमधील सुविधा आदी बाबींवर सोसायटीतील नागरिकांना थेट उन्नतीशी संवाद साधता येणार आहे. http://kundabhise.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला हवी असलेली सुविधा व भेडसावणारे प्रश्न नोंदवून त्याचे अपडेट्स घेता येणार आहेत. कुंदा भिसे यांनी पारंपरिक सन, समारंभाच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याबरोबरच हायटेक ‘डीजीटल’ माध्यमातून देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा पर्याय अवलंबिला आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या उन्नतीसोबत संवाद साधून आपल्या समस्या नोंदवून त्या सुटेपर्यंत उन्नतीशी ‘कनेक्ट’ राहता येणार आहे.