अपना वतन संघटनेच्या पाठपुराव्याला | सोनिगरा रिअलकॉन बिल्डरला पावणेतीन कोटीची दंड

अपना वतन संघटनेच्या पाठपुराव्याला | सोनिगरा रिअलकॉन बिल्डरला पावणेतीन कोटीची दंड
  • तब्बल ११ महिने पाठपुरावा केल्यानंतर मुळशी तहसीलदारांना आली जाग

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये अनेक बिल्डर गौणखनिज उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन करीत आहेत. अनेक बिल्डर तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमत करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. डांगे चौक, गुजरनगर येथील सोनिगरा रिअलकॉन या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना गौणखनिज उत्खनन केल्याबाबतची तक्रार अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी २७ जानेवारी २०२१ रोजी केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींवर दुर्लक्ष केले होते. परंतु अपना वतन संघटनेच्या वतीने पुन्हा १९ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसीलदार मुळशी यांना संबंधित बिल्डरवर कारवाई बाबत पत्र दिले होते.

यांनंतरही कारवाई न झाल्याने शेवटी मुळशी तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यास होत असलेली टाळाटाळ व दिरंगाई बाबत विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे ९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शेवटी मुळशी तहसीलदार अभय चव्हाण यांनी सोनिगरा रिअलकॉन या बांधकाम व्यावसायिकास अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

या नोटिसीमध्ये म्हटले आहे कि, सोनिगरा रिअलकॉन यांनी कोणत्याही प्रकारची शासनाची पूर्व परवानगी न घेता ६६१६ ब्रास इतके माती/मुरूम याचे अनधिकृत उत्खनन केलेले आहे. सोनिगरा रिअलकॉन यांना एकूण २ कोटी ८८ लाख ६८ हजार ४५२ रुपये एवढा दंड भरणेबाबत नोटीस बजावली असून सदर नोटिसीचे उत्तर न दिल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम १७६,१७८ ते १८४ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८/७ व ४८/८ नुसार कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व गौणखनिज वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्री व वाहने जप्त करण्यात यावीत. तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या हद्दीतील तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर व्यक्तीक जबाबदारी निश्चित करून शिस्तभांगाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेकडून करण्यात आली आहे.