भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा! अन्यथा महापालिकेत त्यांना आणून सोडणार

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा! अन्यथा महापालिकेत त्यांना आणून सोडणार
  • शिवसेनेचे अनंत कोऱ्हाळे यांचा महापालिकेला इशारा

चिंचवड : चिंचवडगावात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेमार्फत महापालिका कार्यालय व महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी या भटक्या कुत्रांना आणून सोडले जाईल. असा इशारा शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी दिला आहे.

याबाबत कोऱ्हाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या कुचकामी कामकाजामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात एका २० वर्षीय तरूणीचा नाहक बळी गेला आहे.

दरम्यान, चिंचवडगावामध्ये मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. रात्रपाळीवरून घरी येणाऱ्या महिला – पुरुष कर्मचाऱ्यांना या मोकाट कुत्र्यांमुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. आता तर या कुत्र्यांनी रात्रभर भुंकून नागरिकांची झोप देखील उडवली आहे. नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने व नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अशा मोकाट व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. असे निवेदनात नमुद केले आहे.

याप्रकरणी महापालिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे म्हणाले की, चिंचवडगावातील भटक्या कुत्र्यांना नियमानुसार पकडून रेबिज लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येईल.