विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा
जेट जगदीश
आपल्यातील अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सवी उन्माद जया सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो.
देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते… बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची. पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते.
'बाबावाक्यम् प्रमाणम्' ही शब्दप्रमाण्यवादी वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं. आधुनिक भ...