समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब
जगदीश काबरे
स्त्रियांच्या प्रगती वरुन देशाची प्रगती ठरते म्हणून स्त्री-पुरुष समानता असणे आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणूनच स्त्री-पुरुषांना समान वेतन, बाळंतपणाची रजा, घटस्फोटाचा पोटगी कायदा, वारसा हक्कात मुलींना संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदा असे अनेक लाभ स्त्रियांच्या पदरात पाडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या शिक्षित स्त्रिया आणि उच्चवर्णीय जेव्हा त्यांच्याबद्दल "ते तर 'त्यांचे' नेते आहेत", असे तुच्छतेने बोलतात तेव्हा ते कृतघ्नपणाचा कळस गाठत असतात. ज्या बाबासाहेबांनी स्त्रियांना व्यक्ती म्हणून ओळख मिळावी वर उल्लेखलेले कायदे करून पुरुषकेंद्री समाजाला बाध्य केलं, त्याच बाबासाहेबांविषयी अशा पद्धतीने जेव्हा आजचे शिक्षित - सुशिक्षित नव्हे, त्यांचा एका जातीय दृष्टिकोनातून विचार करत असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. हे म्हणजे उपकार कर्त्यावर अपकार क...