शेतकरी नावाची बाप माणसं
नितीन थोरात
शेतकरी नावाची माणसं माहितीयेत? अत्यंत वाईट जमात. यांच्यावर कितीही अन्याय करा. तरीही ही शेती करतातच. स्वत:चं आणि दुनियेचं पोट भरायची कसली हौस असते यांना ती त्यांनाच माहिती?
ऊन ४५ डिग्रीवर गेलं की मी तर बाबा एसीमध्ये बसून राहतो. पण, ही अडाणी माणसं अशा उन्हातपण रानात सऱ्या तोडताना दिसतात. काळवंडतात. करपतात. पार भाजून निघतात. पण, धान्य पिकवायच्या मागं लागलेली असतात.
मरणाची थंडी पडते, तेव्हा मी मस्त ब्लँकेटमध्ये लोळत पडतो. उबदार कानटोपी, स्वेटर घालून टीव्ही पाहतो. पण, शेतकरी नावाची गयबानी लोकं अशा थंडीतपण पाटात उभी असतात. यांच्या पायाला मुंग्या येतात. गारठून पाय बधीर होतात. दगडाची चिपळी सर्रकन पाय कापून टाकते अन् पाण्यासोबत रक्ताची धार वाहू लागते. तरी यांना फिकीर नसते. कारण यांना दुनियेचं पोट भरायचं असतं.
परवाच्या पावसात तर मी गॅलरीत बसून मस्त फोटो काढले. वाफाळता चहा घेत...