जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते होणार शिवस्मारकाचे अनावरण शनिवारी आणि रविवारी ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रिचे आयोजन
अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजंयती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त फाल्गुन वद्य तृतीया सोमवारी (दि. २१ मार्च) पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री शिवमुर्तीस दुग्धाभिषेक ; ८ वाजता होमहवन व जन्मोत्सव पाळणा ; मानकरी महिलांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्मारकापर्यंत भव्य पालखी सोहळा ; सायंकाळी ५:३० वाजता शिवराज्याभिषेकाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे जिवंत सादरीकरण आणि सायंकाळी ६ वाजता जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपारिक वाद्य, ढोल पथक आणि फटाक्यांची आतषबाजी, रात्री १० वाजता महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी (दि. १९ आणि २० मार्च) सायंकाळी ६ वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविलेले दिग्दर्शक
ॲड. विनय चंद्रकांत घोरपडे लिखित निर्मित आणि दिग्दर्शित ‘ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रि’ हे महानाट्य सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी (दि. १९ मार्च) शिवपुर्वकाळ ते शिवराज्याभिषेक ; रविवारी (दि. २० मार्च) छत्रपती संभाजी महाराज ते औरंगजेब मृत्यू या सर्व प्रसंगांचे जिवंत व ज्वलंत इतिहासाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये चार मजली सरकता १०० फुटांचा रंगमंच, मर्दानी खेळ व चित्तथरारक लढाई, घोडे, उंट, बैलगाड्यांचा प्रत्यक्ष रंगमंचावर वावर, शिवकालीन ऐतहासिक वेषभुषेतील ५०० कलाकारांचे सादरीकरण आणि नेत्रदिपक आतिषबाजीसह छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा या महानाट्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. हे महानाट्य सर्वांसाठी मोफत असून छत्रपतींचा जाज्वल्य, ज्वलंत इतिहास यामध्ये पहायला मिळणार आहे. शहरातील सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असेही आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.