कविता कोविडची

कविता कोविडची
महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम

कोव्हिड नामे व्हायरस ज्याने दुर्धर केले जिणे
पण व्हायरस मोठा हुशार, शहाणा चाणाक्ष आहे म्हणे

नाकावरची पट्टी पाहून दुडूदुडू धावे दुरी
पट्टी नसल्या मानगुटीवरी अलगद घाले मिठी

कळा ही त्याच्या अंगी नाना, बहुरुपी बनुनी फिरे
डॉक्टर-शास्त्रज्ञांना देखिल चकवा देतो म्हणे

लग्ना जाई गरीबाच्या पण श्रीमंताशी वाकडे
मसणवट्याचे सुतक न मानी, सभांचेच वावडे

सण उत्सव त्या नक्कीच कळती, हसतच येई पुढे
पण राजकीय नेत्यांमधूनी तो, सर सर जाई पुढे

मनगटावरी घड्याळ त्याच्या, वेळ पाळितो खरे
न्याहारी जेवण करूनी रात्री, सावज शोधीत फिरे

व्हायरस नुसता चलाख नाही, शिक्षित आहे म्हणे
अधिकारी ज्या वेळा देती पेपर वाचून कळे

मैदानावर दबा धरी म्हणे, तंदुरुस्ती अडकाठी
उद्यानातही तोची खेळतो, इंतरांना तो दाटी

शाळेची त्या बहू आवडी स्वतःच गिरवी धडे
विद्यार्थ्यांवर भडके भारी, म्हणे कशास शिक्षण हवे?

आरोग्याचे धन पहावेना, रोग्याचा हा धनी
पण भित्यापाठी राक्षस बनुनी सदैव राही मनी

आतिथी बनुनी आला जरी तो सुशेगात राहिला
अती आतिथ्या हकला आता अजीर्ण करूनी सोडा

© प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक