पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. अपुरा आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने भाजप नगरसेवक संतप्त झाले. त्यावेळी महापाैरांनी बैठक आटोपती घेत असल्याचे सांगितले. मात्र, नगरसेवक चंद्रकांत नखाते ह्यांनी पाण्यासंर्दभात बोलू न दिल्याने हातातील माईक महापाैरांच्या दिशेने फेकून दिला. तसेच आम्हाला बोलू द्यायचे नव्हते. तर बोलविले कशाला, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) बैठक आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात दररोज पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पाणी पुरवठा अधिका-यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आठ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावर महासभेत साडेआठ तास चर्चा झाली. शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, शहरातील सर्वच भागात अपुरा आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सर्वच नगरसेवकांनी पाणी पुरवठा अधिका-यांवर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, महापालिकेचे महापाैर राहूल जाधव यांनी पाण्यावर वातावरण तापू लागल्याने बैठक आटोपती घेतली. त्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 27 मधील नगरसेवक चंद्रकांत नखाते हे बोलायला उठले. त्यांनी पाण्यावरुन समस्या मांडण्यास सुरुवात केली. यावेळी महापाैरांनी बैठक संपल्याचे जाहीर केले. परंतू, प्रभागातील समस्यांवर आम्हाला बोलू दिले जात नाही. मग आम्हाला बोलविले कशाला, नगरसेवकांचे ऐेकून घ्यायचे नसेल, त्यांचे प्रश्न मांडूच दिले जात नसतील, तर यापुढे आम्हाला बोलवू नका, असे बोलत त्यांनी हातातील माईक फेकून दिला. त्यामुळे तो माईक पुर्णपणे फुटला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नावरुन सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी आयुक्तांनी पाणी प्रश्न न सोडविल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.