आमच्यात या प्रथा नसतात !

आमच्यात या प्रथा नसतात !

कामिल पारखे

प्रसूतिगृहातून बायकोला आणि आमच्या कुटुंबात नव्याने आलेल्या माझ्या मुलीला घरी नेण्याची वेळ झाली होती. माझी आई आणि बायको सामानाची आवराआवर करायला लागल्या आणि प्रसूतिगृहातील त्या दोन स्वच्छता कामगार महिलांनी आपल्या बक्षिसाची मागणी केली. आठ दिवस तिथे वावरल्याने मी तशी त्यांना काही रक्कम देण्याची मानसिक तयारी केली होतीच.

मात्र खिशातून मी पैसे काढण्याआधीच त्यांनी बाळाच्या पाळण्यात नारळ ठेवण्याची मागणी केली आणि मी चमकलो. ”आम्ही तसली काही परंपरा पाळत नाही. तुम्हाला बक्षिस देण्यात मला काही अडचण नाही,” मी म्हटले.

आमच्यात या प्रथा नसतात !

नारळाच्या मागणीवर मात्र त्या दोघी महिला ठाम होत्या. ” घरी जाताना बाळाचा पाळणा असा रिकामा ठेवायचा नसतो, पाळण्यात नारळ हवाच!” असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या आईच्या कानावर हे गेले तेव्हा ‘कामिल, शेजारच्या दुकानात जा आणि पटकन नारळ घेऊन ये ! असे बाईने मला फर्मावले आणि मला मग दुसरा पर्यायच राहिला नाही.

रिक्षाने घरी आलो तेव्हा बाळाला हाती घेऊन जॅकलिनला दाराबाहेरच थांबावे लागले. लगबगीने बाई आत गेली आणि स्वयंपाकघरातून पाण्याचा तांबा आणि चपातीचा एक तुकडा घेऊन आली, बाळ आणि बाळाच्या आईच्या अंगावरुन चपातीचा तुकडा ओवाळून म्हणजे त्यांची दृष्ट काढूनच मगच मायलेकींचा घरात प्रवेश झाला.

बाळाच्या आगमनानिमित्त शेजाऱ्यांना आणि मित्रांना वाटण्यासाठी आणलेला मिठाईचा पुडा प्रथेनुसार पहिल्यांदा येशू आणि मारियामातेचा फोटो असलेल्या अल्तारापाशी ठेवला होता आणि नंतरच मिठाई वाटण्यात आली.

इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात मी पेढे वाटले तेव्हा खूप जणांना आश्चर्य वाटले. ”पेढे तर मुलगा झाल्यानंतर आणि मुलगी झाल्यानंतर जिलेबी वाटत असतात” असे चारपाच जणांनी मला सांगितले सुद्धा. पण लिंगाधारित असा भेदभाव करायची ही परंपरा मला पाळायची नाही, असे मी म्हटले होते.

आदितीच्या जन्मानंतर काही दिवसांत जॅकलिनच्या एका मैत्रिणीने तिच्या घरात असलेला एक भला मोठा पाळणा आम्हाला दिला. आदिती उठून बसायला लागली तेव्हा आम्ही हा पाळणा त्यांना परत दिला तेव्हा आमच्याकडून काहीही रक्कम वा भेट म्हणून साडीचोळी स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांच्या आग्रहानुसार त्या पाळण्यात केवळ एक श्रीफळ ठेवून आम्ही तो परत केला!

आठ महिन्यांच्या आदितीचे कान टोचण्यासाठी तिला घेऊन आम्ही चिचंवडगावातील नेहेमीच्या सोनाराकडे गेलो तेव्हा त्यांची रक्कम विचारण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र कानाला हात लावण्याआधी ‘पहिले श्रीफळ घेऊन या’, असे आम्हाला फर्मावण्यात आले होते. प्रथा पाळण्याची सवय झाल्याने आता याठिकाणी वाद घालण्याचा प्रश्नच नव्हता.

कळीचा मुद्दा निर्माण झाला तो आदितीचे केस पहिल्यांदाच कापायचे होते तेव्हा. आमच्या घराशेजारीच असलेल्या माझ्या नेहेमीच्या न्हाव्याकडे मी एक वर्षांच्या आदितीला घेऊन गेलो तेव्हा आपल्या नव्या छोट्या गिऱ्हाईकाचे स्वागत करताना कासिम भाई अगदी खूष होते. मात्र तिला उंची वाढवलेल्या खुर्चीवर बसवताना जावळ काढण्याची रक्कम पाचशे एक रुपये आणि एक नारळ इतकी होईल असे त्यांनी सांगितले तेव्हा मी उडालोच. त्यावेळेस माझे केस कापण्यासाठी कासिम भाई दहा रुपये घेत असत.

”जावळ-बिबळ काही नाही, साधे केस कापायचे आहेत,” .असे मी त्यांना सांगितले. पण कासिम भाई मानायलाच तयार नव्हते. ”बाळाचे केस पहिल्यांदाच कापायचे आहेत म्हणजे’जावळ’ आहेच आणि प्रथेप्रमाणे पाचशेएक रुपये आणि श्रीफळ तुम्हाला द्यावे लागेल, नाही म्हणू नका हो ! प्रथा तर पाळायलाच पाहिजे ना !”

पण मी इरेला पेटलो होतो. ”आमच्यात तशी काही परंपरा नाही. तुम्हाला माहित आहे ना? आणि कासिम भाई, जावळ परंपरा तुम्ही, तुम्ही, मला सांगता होय ?.”

मला काय सांगायचे आहे हे कासिम भाईंना पुरेपूर कळाले होते. पण तेही कसलेले नाभिक व्यावसायिक होते. त्यांच्या धर्माच्या आधारावर किंवा आपल्या स्वतःच्या धर्माच्या आधारावर जावळाची रक्कम नाकारणारा त्यांचा मी काही पहिलाच गिऱ्हाईक नसणार. बरे, कासिम भाई यांच्याकडे मी नेहेमीच कटिंगला येत असल्याने आमचे दोघांचे चांगले नाते होते. शेवटी मला हार मानावीच लागली.

श्रीफळ हातात सन्मानपूर्वक ठेवल्यानंतरच कासिम भाईनी हातात कंगवा आणि कात्री घेतली.

पण मी सुद्धा पूर्ण हार मानली नव्हती. पाचशेएक रुपयांऐवजी दोनशे एक्कावन्न रुपये जावळ कापण्यासाठी मी देणार होतो. दिलखुलासपणे हसतहसत कासिम भाईंनीसुद्धा दोन पावले मागे येण्यास होकार दिला होता !

काल तनिष्काच्या जाहिरातीचा वाद झाला आणि आमच्या घरातीलच या सामाजिक, सांस्कृतिक परंपरा संबधित घटनांना उजाळा मिळाला.

Camil Parkhe

Journalist, author, blogger

9922419274

https://camilopark.blogspot.com
https://camilpark.blogspot.com
https://camilparkhe.blogspot.com