सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

डॉ. विश्वंभर चौधरी

१. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. ‘काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे’ अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी ‘असहकार’ असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता.

२. जो शब्द नेहरू विरोधकांना अजिबात आवडत नाही, ‘समाजवाद’ त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू एक गट आणि मोतीलाल नेहरू, सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं कवटाळतात.

३.आझाद हिंद सेनेच्या बाजूनं लढण्यासाठी नेहरूंनी पुन्हा एकवार काळा कोट अंगावर चढवला होता. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचा सन्मान स्वातंत्र्यानंतर नेहरूंनीच केला. सुभाषबाबू गेल्यानंतर त्यांच्या कुटूंबाची देखभाल व्हावी म्हणून पेन्शन नेहरूंनीच पुढाकार घेऊन सुरू केली.

४. सुभाषबाबूंनी ‘सहा महिन्यात स्वातंत्र्य” असा अशक्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात चेष्टेचा विषय बनू शकणारा ठराव पारित केला तेव्हा नेहरूंनी ‘तुम्ही थोर देशभक्त आहात पण फार उतावीळ आहात’असं पत्र लिहीलं. त्या पत्रातून हृद्य संबंध सिद्ध होतो.

५. स्वातंत्र्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास बाबू उतावीळ होते. हिटलर, मुसोलिनी, अगदी कोणीही! अशा हुकूमशहांच्या मदतीनं येणारं स्वातंत्र्यही देशाला वारंवार हुकूमशाहीकडे नेईल म्हणून गांधी-पटेल-सरदारांचा त्यास कट्टर विरोध होता.

६. काॅग्रेसमधून बाहेर पडल्यावर बाबू परदेशी गेले. तिथल्या पत्रकारांनी विचारलं की गांधीजींच्या आणि तुमच्या मतभेदांबद्दल काय सांगाल? बाबू ताबडतोब उत्तरले “आमच्या संस्कॄतीत बाप लेकाचं भांडण लोकांसमोर उघड करत नसतात!’

या इतिहासाचं ज्यांना आकलन करणं शक्य आहे त्यांनी करा. मर्जी है आपकी, आखिर सर है आपका