प्रेमीयुगुलांच्या खुनाला जबाबदार कोण? तो ती की आपण?

प्रेमीयुगुलांच्या खुनाला जबाबदार कोण? तो ती की आपण?

डॉ. वृषाली बर्गे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाडगावमध्ये किर्ती मोटे – थोरे (वय २१) हिचा प्रेमविवाह केल्याने आईसह भावाने कोयत्याने शिर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केला. इतकचं नव्हे तर भावाने तिच्या कापलेल्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला, कपडे बदलले आणि पोलिसात गेला.

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना. ही घटना वाचतानाही डोळ्यातील पाणी तुटत नाही आणि यांनी पोटच्या गोळ्याला इतक्या अमानुषपणे कस संपवलं? ‘ माणूस ‘ म्हणून किती काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. आई – मुलीचं नातं म्हणजे मनातलं हितगुज करणारी जागा, बाप- मुलीचं नात म्हणजे हृदयाचा पाझर, डोळ्यातून कधी वाहत नाही पण हृदयात अथांग माया ; भाऊ – बहिणीचं नातं म्हणजे प्रत्येक संकटात सोबत. जिथं राखी बांधून बहिणीचं रक्षण करायची जबाबदरी भावावर असते तोच भाऊ किर्तीसाठी ‘ काळ ‘ ठरेल, जन्मदात्री त्याची सोबत करेल आणि जन्मदाता त्यांना प्रोत्साहन देईल हे कीर्तीला स्वप्नातही वाटल नसेल.

पण अशीच अनेक प्रेमीयुगुलांची संसार थाटण्याची स्वप्न त्यांच्या घरच्यांनी उधळून लावली, नव्हे त्यांचा ‘ सैराट ‘ केला. का माणूस इतका हैवाणा सारखा वागतो ? ते ही आपल्याच पोटच्या गोळ्याबरोबर. मला वाटत त्याला समाज म्हणून आपण जबाबदार आहोत.

प्रेमीयुगुलांच्या खुनाला जबाबदार कोण? तो ती की आपण?

आजही ‘प्रेम’ ही संकल्पना खूप वाईट समजली जाते. पूर्वापार प्रेमाकडे खूप तुच्छतेनं पाहिलं जात आहे. ‘नैसर्गिक भावना ‘ कोणी लक्षातच घेत नाही. भावना दडपण योग्य मानलं जातं. त्यातच अलीकडे प्रेमाला आले लं ‘बाजारू स्वरूप’ खूप घातक आहे. टाईमपास , वन नाईट स्टॅन्ड, ‘व्हॅलेंटाईन डे’ चे इव्हेंट हे मार्केटिंगचे फंडे असले तरीही मध्यमवर्गीय यात भरडला जातोय.

आधीच आमचा समाज भरडला जातोय तो जातीपाती आणि धर्मामध्ये. एकविसाव्या शतकात ही अरेंज मॅरेज करताना आजही जाती, पोटजाती , कुंडली या गोष्टींचा कटाक्ष असतो. तिथं ‘प्रेम’ या भावनेला थाकासतूर लागू दिला जात नाही. त्यात जातीतील असेल तर थोडाफार विचार होतो पण आंतरजातीय असेल तर त्यावर फुली मारली जाते. म्हणजे तुमचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र तुम्हाला नाही. आम्ही जे निकष लावलेत त्या पद्धतीनं तुम्ही गेलात तर त्या मुलाला , मुलीला प्रतिष्ठा असते. या रूढी, परंपरेच्या विरूद्ध ‘ ब्र ‘ शब्द जरी काढला तरी मुलांना जन्माला घातल्याच फार मोठं पातक केलं अस पालकांना वाटत. त्यापेक्षा ‘ वांझ बरे ‘ ही भावना त्यांच्यात वाढीस लागते. मग सुरू होतं द्वंद आपल्याच पोटच्या गोळ्याबरोबर नको त्या समाजासाठी.

समाज काय म्हणेल?

समाज काय म्हणेल ? याचा खूप मोठा दबाव पालकांवर असतो. ‘ स्त्री ‘ हे ‘काचेचे भांडे ‘ म्हणून या संकल्पनेत मुलगी जन्माला आल्यापासून तिची सासरी पाठवणी करेपर्यंत किंवा अगदी त्यानंतर सुद्धा तिला या जोखडाला बांधून ठेवल जातं. अगदी शाळेतल्या चीट्टी चपाटीपासून कॉलेजमध्ये भुुर्रकन स्कुुटीवरून जाणाऱ्या तरुणीपर्यंत ‘समाज ‘ नाावाचा घटक तिच्यावर कमेंट पास करत असतो , आपल्या अकलेचे तारे तोडत असतो.

मग त्यात शिक्षक , पालक, शेजारी, मित्र परिवार, नातेवाईक सगळेच येतात. तुमच्या मुलीची लक्षणे बघा, याच्या बरोबर बोलली, त्याच्या बरोबर गेली, फोनवर २४ तास काय असतं एवढं , वेळोवेळी मुलींचे फोन कॉल्स चेक करत जा असे सल्ले देणारे महाभाग आपल्या आजूबाजूला असतात. या सगळ्या कडक पहाऱ्यातून एखाद्या मुलीने धाडसाने प्रेमविवाह केलाच तर तो घरच्यांना घोर अपमान वाटतो.

का अपमान वाटतो यांना?

या समाजाला आता काय उत्तर द्यायचं ? हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर ‘आ ‘ वासून उभा असतो. लेकीनं तोंड काळ केलं, घराची अब्रू गेली. उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवताच ‘पिंकी कुठे गेली ? दोन दिवस दिसली नाही. ‘ किंवा अगदी सहानभुती ‘ पिकिंन असं करायला नको पाहीजे होतं. ‘ किंवा याच्याही पुढे जाऊन ‘ गेली ना पळून, खाल्लं ना शेण ? ‘ किंवा ‘ लक्षणं आम्हाला सुरुवातीलाच कळली होती , स्कुटीवरून भुुर्रकन जाताना..’ अशा एक ना दोन कितीतरी प्रश्नांंची सरबत्ती त्यांच्यावर सुरू होते. अगदी तोंडावर आणि माघारी अनेक वाईट कमेंट पास केल्या जातात. गल्लीत, कॉलनीत, नातेवाईकांत हा विषय चवीने चघळला जातो. या सगळ्या गदारोळात आपण खूप मोठी प्रतिष्ठा गमावून बसलो आहोत. हे शल्य पालकांना बोचतं. म्हणून गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी ते पोटच्या गोळ्याला मारायला तयार होतात , तेही नको त्या समाजासाठी.

यासाठी आपली एखादी कमेंट एखद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करते, करायला भाग पाडते. याचा विचार समाज म्हणून आपण करायला हवा. जो अधिकार आपल्याला नाहीच तिथं एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर हुकमत गाजवत त्याच्या जीवाशी खेळणं ‘माणूस ‘ म्हणून आपल्याला शोभत नाही. आपल्यालाही कोणीतरी आवडतचं की, कोणतरी आपल्यावर प्रेम करतचं की. अर्थात त्यात वाईट काहीच नाही. पण समाज म्हणून बोलताना आपल्या जिभेवर ताबा ठेवला, शांत राहिलं तर एखाद्या जीवाची अशी तडफड होणार नाही. आपलं वागणं, बोलणं एखाद्याला कितपत टॉर्चर करतं, त्यांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याचा खून करेपर्यंत, तर खरे खुनी आपण आहोत. इतकं हे बोलणं कृतीपेक्षा घातक आहे.

या घटनेत अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्या मुलीचे वडील रागाने घरातून निघून गेले आणि परत आल्यावर सारखं म्हणत होते की, ” पोरीचं काहीतरी करा नाहीतर मी स्वतः जीव देतो.” म्हणून आई व मुलांनं आपल्या मुलीचा, बहिणीचा खून करण्याचा निर्धार केला. एकंदरीत आजही आपल्या कुटुंबात पुरुषसत्ताक किंवा कुटुंबातील प्रमुख वडीलधारी व्यक्तीचा आदर असावा, मानसन्मान केला जावा असे अनेक संस्कार केले जातात. पण ते म्हणतील ती पूर्व दिशा हे आजच्या काळात होत नाही. मोठ्या व्यक्तींची विचारसरणी चुकीची असू शकते. त्याला पायबंद घालता यायला हवा. चुकीच्या विचारसरणीला विरोध करता यायला हवा हा पायंडा पडायला हवा, मग हे मानव जातीला लज्जास्पद असणार हिंसक कृत्य होणार नाही. जुन्या पिढ्या भौतिक बदल स्वीकारतात मग प्रगल्भ वैचारिकता ही त्यांनी स्वीकारायला हवी.

यासाठी हरियाणातील ‘सेफ होम’ ची संकल्पना खूप चांगलं उदाहरण आहे. हरियाणात पोलीस निवासाच्या शेजारी जोडप्यांची राहायची सोय केली आहे. हे जोडपं न्यायालयाकडे अर्ज करतं. न्यायालयाच्या आदेशानुसार या जोडप्याला एक महिन्यासाठी राहणं, खाणं पूर्ण मोफत मिळतं. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. दरम्यान या एका महिन्यात त्या जोडप्याच्या कुटुंबियांसोबत सकारात्मक संवाद साधला जातो. त्यांच्यातील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. जोडप्यांच्या जीवाला काही धोका होणार नाही, तुम्ही त्यांची चांगली जबाबदारी घ्याल हे सगळं लिहुन घेतल जातं. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही ‘ सेफ होम ‘ आहेत. त्यामुळे तिथे ‘ डिस ऑनर किलिंगच ‘ प्रमाण कमी झालेलं दिसतं. निश्चितच महाराष्ट्रात या प्रयोगांची गरज आहे. यासाठी पोलीस यंत्रणेची मानसिकता सकारात्मक असायला हवी. कारण संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांवर असायला हवी तिथे तेच विरुद्ध कृती करताना दिसतात.

एकंदरीत कुटुंब, शाळा-कॉलेज, शासन, प्रशासन, समाजाने मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे ‘प्रेम व आकर्षण ‘ हे उपक्रम व ‘जोडीदाराची विवेकी निवड’ ही चळवळ विस्तारायला हवी. त्याच वेळी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ व ‘ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ असं आपल्या कृतीतून सार्थ करणारा सुदृढ समाज आपण निर्माण करू. निश्चितच याची सुरुवात आपल्या स्वतःपासून असायला हवी.