विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली

विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली
  • उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन

पिंपरी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी विशेष सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अनेक सवलती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले होते.

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रविवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शेकडो दिव्यांग मुलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला.

विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे सहसचिव मनोजकुमार बोरसे, ऋषाली बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, नंदकिशोर आहेर, समीना काझी, मच्छिन्द्र वीर, किरण जाधव, आदित्य हेंद्रे, पालक प्रतिनिधी व स्वयंसेवक म्हणून महेश चौधरी, सतीश ढगे, संतोष कांबळे, सौ. डांगे, हर्षल सुरवसे, शुभम आदी उपस्थित होते.

सदर शिबिरांतर्गत दिव्यांग विविध शासकीय अर्थसाहाय्य योजना, अपंगत्वाचे ओळखपत्र, पॅनकार्ड नोंदणी/दुरुस्ती, व्यवसाय कर सवलत, उत्पन्न कर सवलत, रेल्वे/बस प्रवास सवलत आदी विविध सवलत व योजनांचा लाभ या लहान दिव्यांग मुलांना देण्यात आला.

याप्रसंगी बोलताना उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवाना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून जीवन जगण्याचे त्यांचे कौशल्य खरेच कौतुकास्पद आहे. त्यांना फक्त मानसिक आधार आणि सन्मानाची आवश्यकता असते. उन्नती सोशल फाउंडेशन सातत्याने दिव्यांग बांधवांच्या सहकार्यासाठी प्रयत्नशील असून भविष्यातही त्यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, शिबीर समारोपप्रसंगी लाभार्थी दिव्यांग बांधव, त्यांचे पालक व उपस्थित नागरिकांनी उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले.