डॉ. श्रीमंत कोकाटे
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय. शिवाजीराजांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाऊ नये, त्यांचे कृषी धोरण, युद्ध धोरण, प्रशासन धोरण, आरमार, महिला विषयक धोरण, स्थापत्यशास्त्र, धार्मिक धोरण, गुप्तचर यंत्रणा, समतावादी तोरण, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी विषयावर चर्चा होऊ नये. जयंतीचा वाद निर्माण करून सनातनी व्यवस्थेने छत्रपती शिवाजीराजे यांची अवहेलना सुरू ठेवलेली आहे. त्यांच्या जागतिक प्रभावाला पायबंद घालण्यासाठी शिवजयंतीचा वाद निर्माण केला जातो.
कोणत्याही व्यक्तीचा जन्म एकदाच होतो. तो तीन-तीन होत नाही. तीन वेळा शिवजयंती साजरी करणे, हा एखाद्या महापुरुषाचा अवमान असतो. शिवरायांचा जन्म एकदाच झाला, तो तीन वेळा झाला नाही, त्यामुळे तीन वेळा जयंती साजरी करणे, ही तर त्यांची विटंबनाच आहे. ही विटंबना थांबावी व शिवजयंतीची तारीख निश्चित व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने 1967 साली शिवचरित्र अभ्यासकांची समिती नेमली होती. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, ग. ह. खरे, दत्तो वामन पोतदार, वा. सी. बेंद्रे, ब.मो. पुरंदरे इत्यादी होते. या समितीने निर्णायक अहवाल दिला नाही. भाजप-शिवसेना युतीच्या काळात (1995 ते 2000) विधिमंडळात शिवजयंती बाबत चर्चा होऊन भाजप-सेना सरकारने 19 फेब्रुवारी 1630 ही शिवजयंतीची तारीख निश्चित केली. दरम्यान विधानसभेच्या निवडणुका मुदतपूर्व सहा महिने अगोदर झाल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले.
भाजप-शिवसेना सरकारने घेतलेला 19 फेब्रुवारी 1630 चा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाने जाहीर केला. अनेक वर्षापासूनचा वाद संपून शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. शिवजयंतीचा वाद मिटवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला. मग हा वाद कोणी सुरू केला?
शासनाने 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर केल्या बरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगावकर यांनी महत्त्वाच्या वर्तमानपत्रात जाहिराती देऊन (बातम्या देवून नव्हे) शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचे आवाहन केले. म्हणजे शिवजयंतीचा वाद हा कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हे, तर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगावकर यांनी सुरू केला आहे.
जे साळगावकर शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात. त्यांचे कालनिर्णय कॅलेंडर बाजारात चैत्र महिन्यात का येत नाही? ते जानेवारी महिन्यात येते. जयंत साळगावकर जर इतके संस्कृतिरक्षक आणि तिचे उपासक होते, तर मग स्वतः तारीख का वापरतात? त्यांनी प्रथम स्वतःचा कालनिर्णय कॅलेंडरचा व्यवसाय तिथीप्रमाणे करायला हवा होता. छत्रपती शिवरायांसारख्या जागतिक कीर्तीच्या युगपुरुषाच्या जयंतीचा वाद निर्माण करून जयंत साळगावकरांनी शिवरायांचा घोर अपमान केलेला आहे.
शिवजयंतीसाठी तारखेला विरोध तिथीचा आग्रह का? आपल्या देशातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधिमंडळ, संसद, न्यायालय, शाळा, कॉलेज, विद्यापीठ, औद्योगिक क्षेत्र, प्रवासी क्षेत्र इत्यादी कारभार तारखेप्रमाणे चालतो. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत देखील चालत नाही. शिवजयंती निर्विवादपणे देशभर-जगभर साजरी होऊ नये, म्हणून सनातनी विचारांचे तारखेला विरोध व तिथीचा आग्रह धरतात. तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. शिवचरित्र पळी पंचांगात बुडवून संपवायचं हा साळगावकर पंथाचा डाव आहे.
जे लोक शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात, ते लोक खाजगी आणि सार्वजनिक जीवनात तारीख वापरतात. आपल्या बापाचे वाढदिवस, स्मृतिदिन तारखेप्रमाणे साजरे करतात. मग शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का?
तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर शिवजयंती देशासह परदेशातील देखील निर्विवादपणे साजरी होईल. शिवजयंती जगभर निर्विवादपणे साजरी होऊ नये, यासाठी शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह धरला जातो.
शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात आणि तारखेला विरोध करतात ते तथाकथित संस्कृतीरक्षक मोबाईल, टू व्हीलर, फोर व्हीलर, बस, रेल्वे, विमान का वापरतात? त्यांनी बैलगाडीने फिरायला पाहिजे.
शिवाजी महाराज पुराणपुरुष की ऐतिहासिक महापुरुष?
शिवाजी महाराज हे पुराणपुरुष नाहीत, तर ते जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक महापुरुष आहेत. त्यांचा जन्म, बालपण, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांचा मृत्यू यांच्या तारखा उपलब्ध आहेत. म्हणजे ते ऐतिहासिक महापुरुष आहेत, त्यांचा संबंध समकालीन अशा मोगल, पोर्तुगीच, डच व ब्रिटीश इत्यादी जागतिक सत्ताधीशांशी आला आहे म्हणजे शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत हे सिद्ध होते. आज जगात तिथी चालत नाही, तर तारीख चालते. त्यामुळे तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करणे हे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला आणि इतिहासाला संयुक्तिक आहे
कॅलेंडरवाल्यांचा खोडसाळपणा
शिवजयंती तारखेप्रमाणे आणि शिवजयंती तिथीप्रमाणे असे कॅलेंडरमध्ये छापतात, हा त्यांचा खोडसाळपणा आहे. जाणीवपूर्वक शिवप्रेमीमध्ये फूट पाडून गैरसमज निर्माण करणे, शिवरायांची अवहेलना करणे, हा या पाठीमागील कट आहे. शिवप्रेमी मधील एक गट बाजूला काढून त्यांना सनातनी व्यवस्थेसाठी वापरण्याचा हा कट आहे. त्यामुळे अशा कॅलेंडरवर बहिष्कार टाकून एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती छापणारे कॅलेंडर विकत घ्यायला हवे.
जसेही शिवजयंतीचा वाद संपून शिवजयंती 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होऊ लागली. तसेही नाना प्रकारे शिवजयंती बंद पाडण्याचे कटकारस्थान सुरू झाले. तिथीचा आग्रह धरणे, तारखेला विरोध करणे, संस्कृतीच्या गप्पा मारणे आणि अलिकडच्या काळात तर 19 फेब्रुवारीला लग्नाचा मुहूर्त देखील काढला जात आहे. या तारखेला मोठ्या प्रमाणात विवाह समारंभासाठी शुभ दिवस म्हणून सांगितला जात आहे. शिवजयंती सोडून विवाह समारंभात शिवप्रेमी अडकून पडले पाहिजेत. हा सनातनी डाव आहे. भट लग्नासाठीची तिथी सांगतो 19 फेब्रुवारीला लग्न तिथी ही भटी कटकारस्थान आहे. अशा भटी कटकारस्थानाला बळी न पडता सर्वांनी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी.