वरोडा : खाजगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरिता एका व्यक्तीस आभासी तिकीट काढून दिले. हे तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात तडजोड करण्यासाठी ६० हजार रुपयाची लाच घेताना वरोडा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षकास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
वरोडा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलामध्ये गोपिका मानकर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भद्रावती येथील खाजगी संगणक संचालकांनी एक महिन्यापूर्वी एका व्यक्तीस रेल्वे प्रवासाकरिता आभासी तिकीट काढून दिले. ही बाब उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना माहित झाली. त्या संगणक संचालकावर रेल्वे सुरक्षा दल वरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी तडजोड करण्याकरिता गोपिका मानकर यांनी तक्रारकर्त्यास एक लाख रुपयाची मागणी केली. त्यामध्ये ६० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने याबाबत केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध नागपूर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार वरोडा रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्रीच्या सुमारास ६० हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले.
ही कारवाई नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक एम. एस खान यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी एस्सार चौगुले, पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे, पोलीस निरीक्षक निरज गुप्ता, कविता सरकार, उपनिरीक्षक विनोद कराळे, कोमल गुजरकर, संदीप ढोबळे, सीएम बांगडकर, कीर्ती बावनकुळे, राजेश डेकाटे यांनी केली.