जि.प.शाळा पथराड घडवतेय गुणवान विद्यार्थी
लोकसहभाग – लोकसहभागातून शाळेसाठी प्रोजेक्टर खरेदी केला.
विद्यार्थीनी – ४५
विद्यार्थी – ५१
एकूण – ९६
कजगाव ता. भडगाव जि. जळगाव येथून जवळच असलेल्या जि.प.शाळा पथराड शाळेत आज रोजी सर्व विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहेत, विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वयाने आज या शाळेतील विद्यार्थी आधुनिक जगाशी जोडले गेले आहेत, नवनवीन माहिती शिकू लागली आहेत.तसेच शिक्षकांच्या मदतीने डिजिटल साहित्य स्वतः वापरू लागली आहेत आणि शाळा प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन गतीने वाटचाल करत आहे.
विशेष म्हणजे ४ वर्षापूर्वी या शाळेची सर्वच क्षेत्रात हलाखीची स्थिती होती.त्यावेळेस शाळेत नव्याने आलेले शिक्षक नंदू पाटील यांनी ग्रामस्थ व पालक यांच्यात शाळा डिजिटल करण्याविषयी बैठका घेऊन शाळेसाठी २५ हजार रुपये लोकवर्गणी जमा करून प्रोजेक्टर खरेदी केला व तेथूनच शाळा डिजिटल होण्यास सुरुवात झाली.तदनंतर ग्रामपंचायतीने १४व्या वित्त आयोगातून शाळेची संरक्षण भिंत बांधून दिली. तसेच शाळेला रंगरंगोटी करून दिली.त्याचप्रमाणे शाळेत आतून व बाहेरून अभ्यासक्रमावर आधारित छान चित्रे रेखाटण्यात आली व आज शाळा सुंदर व बोलकी झाली. याकामी गावच्या सरपंच रंजनाताई पाटील यांनी व शिक्षण प्रेमी नागरिक भाऊसाहेब पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांच्या प्रयत्नाने आज बरेच इंग्लीश मीडियम ला जाणारे विद्यार्थी या शाळेत पुन्हा आली आहेत व येत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे आज शाळेची गुणवत्ता खूपच वाढलेली आहे.त्यामुळे इंग्रजी मीडियम ला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या खिशाला लागलेली गळती पूर्णपणे बंद झाली आहे. गावातही शाळेबद्दल आनंदाचे व सुरण्क्षिततेचे वातावरण तयार झाले आहे.शिवाय गावचे शिक्षण प्रेमी नागरिक भाऊसाहेब पाटील , सरपंच रंजनाताई पाटील तसेच ग्रामसेवक यांनी शाळेसाठी १४व्या वित्त आयोगातून एक संगणक लवकरच भेट देणार असल्याचे जाहीर केले व शाळा डिजिटल मधे वाढ होतच राहील असे आश्वासन ही दिले.
आज शाळेची प्रगती होण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक नंदू पाटील , दीपक भालेराव , प्रवीण पाटील व मुख्याध्यापक सुकदेव माळी हे सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत .तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक भाऊसाहेब पाटील , गावचे सरपंच रंजनाताई पाटील , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंजाबराव पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक , काशिनाथ महाजन , प्रकाश धुमाळ , माजी जि.प.शिक्षण सभापती विकास तात्या यांच्यासह सर्व शिक्षण प्रेमी पालकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शाळा आकर्षिते सर्वांचे लक्ष
शालेय इमारत आतून व बाहेरून आकर्षक रंगाने रंगवली आहे.इमारतीच्या भिंतीवर आतून व बाहेरून सुंदर व सुरेख चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष शालेय इमारत वेधून घेते यात शंका नाही.तसेच शालेय परिसरात खूपच झाडे लावली आहेत व सुंदर बगीचा तयार केला आहे त्यामुळे परिसर सुंदर व स्वच्छ दिसतो. शालेय भिंती बोलक्या असल्याने विद्यार्थी सुद्धा भिंतीशी बोलू लागले आहेत.
मुख्याध्यापक
गावातील सर्व पालक , ग्रामपंचायत सरपंच , सदस्य व शिक्षण प्रेमी नागरिक भाऊसाहेब पाटील यांचे शाळेसाठी सदैव मदतीची भावना असते, शाळेसाठी हाक दिली तेव्हा त्यांची शाळेत हजर राहण्याची भावना माझ्यासह सर्व शिक्षकांना विद्यार्थी गुणवत्ता व सर्वांगीण विकास वाढीसाठी प्रेरणा देण्यास पुरेसे ठरते. - सुकदेव माळी
शालेय समिती अध्यक्ष
शाळेतील शिक्षक उपक्रमशील आहेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार व डिजिटल साहित्याच्या सहाय्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. विशेषतः शाळेतील शिक्षक नंदू पाटील व दीपक भालेराव हे शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खूपच मेहनत घेत असतात.
-पंजाबराव पाटील
शाळेचे उपक्रम
दररोज २ इंग्रजी शब्द पाठांतर व लेखन , इंग्रजी संवाद सादरीकरण , हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्रुक्षारोपन , वक्रूत्व स्पर्धा , सांस्क्रुतिक कार्यक्रम, मोफत शालेय गणवेश , शैक्षणिक परिसर सहल , वनभोजन , अप्रगत विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासक्रम शिकविणे , दर महिन्याला पालक सभा ,विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची , लिंबू चमचा , धावणे, गोणपाट उद्या अशा आनंददायी स्पर्धा तसेच शाळा तंबाखूमुक्त केली आहे.
पालक काय म्हणतात
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यापेक्षा आज रोजी आमच्या पथराड शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूपच चांगली आहे.त्यामुळे आमच्या छोट्याशा गावातील इंग्रजी माध्यमात शिकणारे जवळजवळ १०ते १२ विद्यार्थी या वर्षी जि प शाळा पथराड शाळेत पुन्हा परत आली. शिक्षकांच्या मेहनतीने हे सर्व शक्य झाले..
-भाऊसाहेब पाटील
शाळेची गुणवत्ता इतकी वाढली आहे की , मी माझ्या मुलाला इंग्लीश मीडियम मधून काढून आमच्या गावातील जि.प.शाळा पथराड या शाळेत दाखल केले.शाळेतील सर्वच शिक्षक गुणवान आहेत व विद्यार्थी घडविण्यासाठी सदैव कार्यतत्पर आहेत. मला कळले की इंग्रजी मीडियम फक्त फार्स आहे.खरी गुणवत्ता तर जि.प.शाळेत आहे. - सोपान प्रकाश चव्हाण