
Lok Marathi News Network
पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेत पारदर्शक सत्तेची हमी देऊन विराजमान झालेल्या भाजप सरकारच्या सत्ताकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत महानगरपालिकच्या भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार सल्लागारांच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच भ्रष्टाचार प्रकरणाची फाईल त्यांनी पालकमंत्र्यांकडे दिली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “ना खाऊंगा, ना खाने दुंगा” ही घोषणा करून भ्रष्टाचार मुक्त भारत करू ही हमी जनतेला दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र ही घोषणा करीत पारदर्शक कारभाराची हमी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०१७ च्या निवडणुकीत भय व भ्रष्टाचारमुक्त महापालिका हे आश्वासन आपल्या पक्षाच्या नेत्यांनी दिले. त्यामुळेच या निवडणुकीत तीन नगरसेवकांवरुन ७७ नगरसेवक निवडून देऊन येथील जनतेने सत्तांतर घडवून आणले.
टक्केवारी काय असते आम्हाला माहीत नाही, ऐनवेळचे विषय घेणार नाही, वाढीव खर्चाला मंजुरी देणार नाही, थेट पद्धतीने कामे देणार नाही, अधिकारी पदाधिकारी ठेकेदार सल्लागार नगरसेवक यांच्या अभद्र युती उद्ध्वस्त करू, महापालिका भ्रष्टाचारमुक्त करू. अशा घोषणा करुन येथील आजचे सत्ताधाऱी सत्तासिंहासनावर विराजमान झाले. मात्र मागील तीन वर्षात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व भ्रष्टाचाराचे विक्रम मोडून नवा विक्रम नोंदवला आहे.
त्यात पंतप्रधान आवास योजनेतील गैरव्यवहार भ्रष्टाचार, शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी डेपो पर्यंत वाहतूक करणे निविदेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, ३१ मार्च २०१७ नंतरचे ठेकेदारांची बिले आडवुन (मुख्यमंत्र्यांची फसवणूक) करून ३०० कोटी रुपये वाचवल्याचा खोटा दावा करणे व त्यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर व अनुषंगिक कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते विकासाच्या सव्वा चारशे कोटीच्या कामातील गैरव्यवहार भ्रष्टाचार, पिंपरी-चिंचवड शहरातील संत पिठाच्या निविदेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, संगणमत करून रक्कम रुपये ५४ कोटीच्या ३६० निविदाप्रक्रियेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, शहर स्वच्छतेचे कामकाज कार्यक्षमतेने होण्यासाठी पंचेचाळीस ४५४४ स्मार्ट वॉच खरेदी प्रकरण, मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शस्त्रक्रिया भ्रष्टाचार, रस्ते विकासाच्या कामातील वाढीव दराच्या नावाने भ्रष्टाचार, अनाधिकृत जाहिरात फलक होर्डिंग्स खर्चातील गैरव्यवहार भ्रष्टाचार, खाजगी केबल नेटवर्कच्या रिलायन्स रस्ते खोदकामतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, रस्ते साफ सफाई तांत्रिक पद्धतीने रोड स्लीपर च्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, भोसरी येथील रुग्णालयाच्या खाजगीकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त दिंडी प्रमुखांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहार, पाणीपट्टी देयके वाटपातील क्रॅनबेरी कंपनीच्या ठेकयातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सन १९८२ ते आजपर्यंत अंतर्गत लेखा परीक्षण व विशेष लेखापरीक्षणतील गैरवर्तन भ्रष्टाचार, शिक्षण विभागामार्फत सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, पवना इंद्रायणी मुळा नदीतील जलपर्णी व कचरा काढण्याच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, ऐनवेळच्या विषय वाढीव खर्चातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, भोसरी मोशी येथील कचरा डेपोमध्ये मुरूम पुरवण्याच्या कामातील गैरव्यवहार भ्रष्टाचार, भोसरी रुग्णालयासाठी ऑक्सिजन गॅस पाईपलाईन निविदेतील भ्रष्टाचार, रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामातील गैरव्यवहार भ्रष्टाचार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवा विभागाने विविध प्रकल्पांना पाणी एनोसी बंद प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. च-होली, रावेत येथील बिल्डर अधिकारी नगरसेवकांच्या संगनमताने झालेला गैरव्यवहार, शहरातील ओला सुका घातक कचरा जमा करण्यासाठी तीस कोटी रकमेची डस्टबिन खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार भ्रष्टाचार, टीडीआर वाटपातील गैरव्यवहार भ्रष्टाचार, २४ बाय ७ पाणी योजनेतील गैरव्यवहार भ्रष्टाचार, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार, अशा विविध ४१ प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.
भाजपाचे नेते पदाधिकारी नगरसेवक मोठ्या टक्केवारीचे राजकारण करून विकास कामे स्वच्छतेचे उद्यानाचे सुरक्षा कर्मचारी आदि कामांचे ठेकेदार झाले आहेत. काही कामात त्यांच्या पार्टनरशिप आहेत. स्थायी समितीत सत्ताधारी विरोधक संगणमत करून मोठ्या प्रमाणात टक्केवारीचे राजकारण करीत आहेत. वाहती गंगा, घ्या हात धुवून या मानसिकतेतून येथील आपले पदाधिकारी चाटून, पुसून, ओरपून, खरडून खात आहेत. या महापालिकेत करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे सुरू आहेत. त्यामुळे मी आपणास विनंती करतो की, या फाईलमध्ये मी दिलेल्या ४१ प्रकरणाची आपल्या माध्यमातून उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे भापकर यांनी म्हटले आहे.