लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोनाच्या पाश्वभुमीवर संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे जेवणाचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थित दोन तरूणांनी पुढाकार घेत श्री धनंजय मुंढे युवा मंचच्या माध्यमातून 270 विद्यार्थ्यांना मोफत घरपोच जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
विजय वडमारे व सचिन बढे अशी या तरूणांची नावे आहेत. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने भारत सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्च पासून संपुर्ण देशात संचार बंदी लागू केली. त्यामुळे खानावळी व हॉटेल बंद करण्यात आली. परिणामी परराज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून शहरात शिक्षण व स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे मोठे हाल सुरू झाले.
ही बाब लक्षात घेता विजय वडमारे व सचिन बढे यांनी 270 विद्यार्थ्यांची जेवणाची मोफत सोय केली आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर व आळंदी जवळील वडमुखवाडीजवळ हे विद्यार्थी राहत आहेत. त्यांना स्वत: दुचाकीवरून जेवणाचे डबे विजय व सचिन पोहचवत आहेत. त्यासाठी त्यांना तीन ते चार हेलपाटे मारावे लागतात. जेवण तयार करण्यासाठी विजय व सचिन यांनी त्यांच्या कुटूंबाच्या मदतीला दोन महिलाही घेतल्या आहेत. या तरूणांच्या या उपक्रमाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीही कौतुक केले.