
पुणे (लोकमराठी) : टाळेबंदी काळात अवैधरीत्या परराज्य आणि जिल्ह्य़ांमधून पुण्यात मद्य आणण्याच्या प्रकरणांमध्ये, तसेच शहरासह जिल्ह्य़ात मद्याची वाहतूक केल्याच्या प्रकरणांमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मद्य तसेच वाहने वगैरे मिळून तब्बल ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी २०१ गुन्हे दाखल झाले असून ४५ जणांना अटक करण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याआधीच पुण्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जमाव आणि संचारबंदी लागू केली होती. याबरोबरच जिल्हाधिकारी राम यांनी शहरासह जिल्ह्य़ातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश प्रसृत केले होते. परिणामी २० मार्चपासून मद्यविक्री, मद्य वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईत २४ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री अशाप्रकारच्या २०१ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली आहे. हे गुन्हे महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
टाळेबंदीत ८३ लाख ७५ हजार ९१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध मद्यविक्री, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या ४५ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २०१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, असेही झगडे यांनी सांगितले. शहरासह जिल्ह्य़ात अवैधरीत्या मद्यविक्री, वाहतूक करणाऱ्यांवर विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मद्यविक्री, वाहतूक करण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून धडक कारवाईही विभागाच्या पथकांकडून करण्यात येत आहे.
पुढील आदेशापर्यंत मद्यविक्री बंदच
टाळेबंदी काळात मद्यविक्री बंद असल्याने अस्वस्थ झालेल्या तळीरामांकडून मद्यविक्रीला परवानगी दिल्याचे संदेश समाजमाध्यमांतून पसरवले जात आहेत. मात्र, पुणे जिल्ह्य़ात प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत मद्यविक्रीला बंदी असल्याचे झगडे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मद्यविक्री बंदीचे आदेश प्रसृत केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी राम यांचे पुढील आदेश येईपर्यंत मद्यविक्री केली जाणार नाही, असेही झगडे यांनी सांगितले.
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे