औरंगाबादमधील गरजू विद्यार्थ्यांना एस.टी. कॉलनीतील महिलांकडून जेवणाची व्यवस्था

औरंगाबादमधील गरजू विद्यार्थ्यांना एस.टी. कॉलनीतील महिलांकडून जेवणाची व्यवस्था
  • प्रत्यक्ष स्वयंपाक करुन पुरुषदेखील महिलांना मदत करतात

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या होत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. अनेक जण राज्यभरातून औरंगाबाद येथे शिकण्यासाठी येतात, परंतु संचारबंदी असल्याने शहरातील अनेक विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन एस. टी. कॉलनी (मुख्य बसस्थानकाजवळ) महिलांनी या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पोळ्या – भाजी देण्याचे ठरवले. तसेच प्रत्यक्ष स्वयंपाक देखील करुन कॉलनीतील पुरुषांनी आवश्यक ती मदत करुन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम या महिला करत आहेत.

१२ दिवसांपूर्वी काॅलनीतील महिलांनी प्रत्येकी १० पोळ्या गरजू विद्यार्थ्यांना पाठवण्याचे ठरवले होते. ३ दिवस हा उपक्रम चालवण्यानंतर या महिलांना लक्षात आले की, केवळ एवढे करुन चालणार नाही. नंतर एकत्रित येऊन शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेवण देण्याचे ठरवले. यानंतर अनेक महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या.
या महिलांची दररोजची दिनचर्या अशी

दररोज दुपारी आपापल्या घरातील कामे आटोपून एस. टी. कॉलनीतील महिला या दत्त मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत जमा होतात. नंतर कामाला सुरुवात होते. सुरुवातीला चूल पेटवतात. चुलीसाठी लागणारे लाकूड, काड्या कॉलनीतील पुरुष जमा करुन आणून देतात. या सर्व काम करणाऱ्या महिलांना डॉ. लता चौधरी या पोळ्यांना लागणाऱ्या गव्हाची मदत करतात. गॅससाठी लागणारा खर्च या माध्यमातून वाचवला आहे. आणि विशेष बाब म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या विविध आवश्यक सूचनांचे पालन देखील या महिला करताना दिसून येतात. जसे की सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणेसह आदी नियम, सूचना त्या पाळत आहेत. यामध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीत दररोज हातावर पोट असणारे मजूर, मराठवाड्यातून तसेच इतर गावांहून शिकण्यासाठी आलेले अनेक विद्यार्थ्यांना जेवण पुरवतात.


यातच उपासमारीने मजूर, विद्यार्थी उपाशी, अनेक नागरिक, गल्ली – बोळात उपासमारीने भटकणाऱ्या मंडळींना या माध्यमातून जेवण पुरवण्याचे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये एक वेळेचे अन्न मिळणे देखील अनेकांना दुर्लभ झाले अाहे. पोटात अन्न नसल्यामुळे रात्रीची झोप येत नसल्याचे अनेक गरजूंनी कथन केले. आणि त्यामुळेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा सर्व शासनाने पारित केलेल्या सूचनेचा अवलंब करत आहेत. या महिलांनी समाजाचं आपण काही देणं लागतो. या सामाजिक जाणिवेतून हा सामाजिक जाण असणाऱ्या उपक्रमाबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर चर्चा केली. या चर्चेमधून परिसरातील सर्व महिलांनी त्यांच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर ही चिंता एकमेकींना बोलून दाखवली. लॉकडाऊनच्या काळात घरातल्या सर्वच जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे पार पाडून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे ठरवले. यात सर्वप्रथम प्रत्येक गृहिणीने आपल्या कुटंुबाला लागणाऱ्या पोळ्यांपेक्षा दहा पोळ्या जास्त करायचा निर्धार केला. परंतु प्रत्येकीलाच हे घरून करणे तेवढे शक्य झाले नाही. कारण लॉकडाऊनच्या काळात सर्वांच्या कुटुंबीयांची आर्थिक घडी देखील जोपासणे गरजेचे आहे.
परंतु या महिलांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला निवृत्त प्राध्यापिक डॉ. लता चौधरी यांनी मोलाची मदत केली. आणि अशक्य वाटणाऱ्या आणि गरजूंपर्यंत काहीतरी अन्नदान तळमळ असणारं स्वप्न हे साकार झाले.


रोज या सर्व महिला स्वतःच्या घरची कामे आटोपून, दुपारी अडीच वाजता एस. टी. कॉलनीत असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात डिस्टन्स ठेवून, चुली मांडून त्यावर २०० पोळ्या तयार करतात. महिलांना चूल मांडून देण्यासाठी, लाकडे गोळा करून देण्यासाठी कॉलनीतील पुरुष वर्ग देखील पुढे सरसावला. गरजूंना वाटणाऱ्या पोळ्या चुलीवर केल्यामुळे प्रत्येक महिलेच्या घरातील गॅसची बचत झाली असून चुलीवरच्या पोळ्यांचा आकार हा घरी केलेल्या पोळीपेक्षा दुप्पट मोठा करता येऊ लागला. त्यामुळे कुठल्याही गरजूला देताना 2 पोळ्यांमध्ये निश्चितच पोट भरेल याची खात्री पटू लागली आणि आपण केलेल्या पोळ्यांमुळे निदान १०० गरजूंची भूक भागवू शकतो हे एक समाधान आणि आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला. डॉ. चौधरी यांनी दिलेल्या मदतीमुळे रोज २०० पोळ्या एस. टी. कॉलनीच्या महिलांच्या सहकार्यामुळे गरजूंपर्यंत पोहोचत आहेत.
यासाठी डॉ. अलका कर्णिक, सुनीता जाधव, तृप्ती बोरसे, राधिका घोडे, शारदा पवार, गिरिजा बिराजदार, अर्चना सूर्यवंशी, स्वाती घोडे, मंगल बत्तीसे, रमाबाई पेटवाल, वंदना पोगुल, सीता श्रावणे वैशाली गायकवाड यांच्यासह राजेंद्र सूर्यवंशी आणि अशोक जाधव यांची मोलाची मदत मिळत आहे. हा समाजयज्ञ लॉकडाऊन काळ संपेपर्यंत म्हणजेच ३ मे २०२० पर्यंत करण्याचा महिलांचा मानस असल्याचे येथील महिलांनी सांगितले. डॉ. अलका चौधरी या दररोज लागणारा गहू, भाजीसह स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू, तसेच त्यांच्या स्वत:च्या गाडीतून गरजू, भुकेल्यांना तयार केलेल्या जेवणाचे वितरण करत आहेत.


या भागामध्ये प्रामुख्याने करतात जेवणाचे वितरण
सेव्हनहिल, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पीर बाजार, अंगुरीबाग परिसरात प्रामुख्याने जेवण वितरित करतात. ‘आम्ही कॉलनीतील १० ते १५ महिलांनी एकत्र येऊन तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा आम्ही मनोभावे करणार आहोत. ही सेवा आम्ही आठ दिवसांपासून करत आहोत. जे लोक कोणतीही मदत करण्यास इच्छुक आहेत ? तसेच कामामध्ये हातभार लावू इच्छितात त्यांनी आम्हाला मदत करावी, असे आवाहन मी यावेळी करत आहे.’ -डॉ. अलका कर्णिक, एस. टी. कॉलनीतील मदतकार्य करणारी महिला