लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

मुंबई, (लोकमराठी) : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते.


कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया) ला ४२ केंद्र १६ हजार १०० थाळ्या मंजूर झाल्या आहेत. या शासनाच्या निर्णयानुसार शिवभोजन केंद्रातून गरजूंना जेवण दिले जात आहे.


शिधा वाटप दूकानांमार्फत ३२ हजार २८१ मॅट्रीक टन धान्याचे वाटप
कोंकण विभागातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्ड धारकांमार्फत ३२ हजार १९८ मॅट्रीक टन धान्याची नियमित वाटपाची उचल झाली असून, शिधावाटप दूकानांमध्ये २४ हजार ७७६ लाभार्थ्यांना ३२ हजार २८१ मॅट्रीक टन धान्याचे नियमित वाटप झाले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कोंकण विभागासाठी ३१ हजार ८३५ मॅट्रीक टन मोफत धान्य (तांदूळ) मंजूर करण्यात आले आहे. यापैकी ५४ टक्के धान्य शिधावाटप दुकांनामध्ये वितरीत करण्यात आले आहे. या याजने अंतर्गत आतापर्यंत विभागातील ३ हजार ६४९ लाभार्थ्यांना मोफत धन्य (तांदूळ) वाटप करण्यात आले आहे.

कोंकण विभागात ५४ हजार ८७८ किराणा दुकाने
लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करु नये यासाठी कोंकण विभागात एकूण ५४ हजार ८७८ किराणा दुकानांना वस्तू विक्रीसाठी चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण ३ हजार ५६३, पालघर ६ हजार ६३२, रायगड २ हजार ४५३, रत्नागिरी २ हजार १९०, सिंधुदूर्ग ५९६, मुंबई-ठाणे शहरी भागासाठी ३९ हजार ४४४ किराणा दुकानांना वस्तू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोंकण विभागातील कोणताही गरजू व्यक्ती जीवनावश्यक वस्तूपासून वंचित राहू नये यासाठी शासनस्तरावर सर्व उपायोजना केल्या आहेत. तरीही याबाबत काही अडचण उद्भवल्यास कोकण उपायुक्त (पुरवठा), शिवाजी कादबाने अथवा नजीकच्या जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.