औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राथमिक विद्यामंदिर व जिल्हा आरोग्य केंद्र, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दंत आरोग्य चिकित्सा’ मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी दंतवैद्य जिल्हा रुग्णालय औंध येथील डॉ. सुहासिनी घाणेकर (Dr. Suhasini Ghanekar ) या उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सुरुवातीला चांगल्या दातांचे महत्त्व पटवून दिले. दात खराब असतील, किडलेले असतील, तुटलेले असतील, वाकडेतिकडे उगवले असतील तर अशा व्यक्तीचे सौंदर्य लोप पावते. मुलांचे दात दुखत असतील तर मुले रात्रभर पालकांना झोपू देत नाही. पालकांचे दात दुखत असतील तर वेदना जाणवल्यामुळे कामावर लक्ष लागत नाही. यासाठी दातांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. मुलांचे व पालकांचे दात खराब होण्यापाठिमागचे महत्त्वाचे कारण म्हणजे वेळेवर दात न घासणे, चॉकलेट किंवा इतर स्निग्ध पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरणे ही प्रमुख कारणे आहेत. दात किडणे, दुखणे, तिरपे उगवणे यासाठी दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. मुलांच्या दातांची काळजी घ्यायची असल्यास अगोदर पालकांनी सुरुवात करायला पाहिजे. त्यानंतर मुले अनुकरण करतील. मुलांनी आणि पालकांनी दिवसातून दोनदा दात घासण्याची सवय लावली पाहिजे. तरच आपले दात सुदृढ राहू शकतात. डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी चांगले दात कसे घासावेत हे प्रत्यक्ष दाखविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय नगरकर म्हणाले डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी खूप साध्या सोप्या भाषेत चांगल्या दातांचे महत्व सांगितले. तसेच आपण दातांची निगा कशी राखावी याबाबत जागृती निर्माण केली. दातांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर अगोदर पालकांनी सुरुवात करायला पाहिजे. कारण मुले पालकांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे पालकांना अगोदर शिक्षण दिले पाहिजे. शाळा-कॉलेज हे अज्ञान दूर करण्यासाठी निर्माण झालेली मंदिरे आहेत. दातांच्या बाबत असलेले अज्ञान या व्याख्यानातून निश्चितपने दूर होईल अशी आशा डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापक अरविंद जाधव, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. हनुमंत हाडे, डॉ. भूषण मिस्त्री, डॉ. मोहिनी भोसले, प्रा.मधून ढोरे, प्रा. खाडे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.सौ.नलिनी पाचर्णे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशीलकुमार गुजर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.अतुल चौरे, प्रा. मारुती कांबळे व बहुसंख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.