हडपसर ( प्रतिनिधी) : शिक्षक हा शिक्षणावर प्रेम करणारा असावा. लोकशाही संस्कृतीला पोषक नागरिक तयार करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. शिक्षकाने समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. पालक आणि शिक्षकांचे नाते दृढ व एकोप्याचे असावे. शिक्षक हा सामाजिक उपक्रमात सहभाग घेणारा व विद्यार्थ्यांचा आदर्श असावा. असे मत प्राचार्य डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये साधना शैक्षणिक संकुलाने आयोजित केलेल्या शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून “शिक्षण आणि समाजाप्रती शिक्षकाची भूमिका ” या विषयावर बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष, आमदार चेतनदादा तुपे यांनी या उपक्रमासाठी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी असलेला, विज्ञाननिष्ठ विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी विद्यार्थी शिक्षकाने घडवावेत. काळ कितीही बदलला तरी शिक्षकाची भूमिका ही केंद्रस्थानी राहील. असे मत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी आहेर यांनी मानले. या व्याख्यानाला प्राचार्य विजय शितोळे, प्राचार्य सुजाता कालेकर, प्राचार्य रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका सौ. झीनत सय्यद, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने केले.