- यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस तर्फे राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा
पिंपरी, ता. १२ जानेवारी : युवकांनी आपल्यातील असीम क्षमता वेळीच ओळखावी आणि स्वतःचे दैदिप्यमान भविष्य घडविण्यासाठी कायम स्वयंप्रेरित राहा असे मत स्वामी विवेकानंद केंद्राच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या समन्वयक डॉ.वंदना महाजनी यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद जयंती दिनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातील विविध घटनांचे दाखले देत त्या प्रसंगातून आपल्याला काय शिकवण मिळते हे सांगितले. युवापिढीने आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता व महत्वाकांक्षा या गुणांची जोपासना करीत स्वतःचे विचार व वर्तन याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस, चाणक्य, अरुणिमा सिन्हा, जे. आर. डी. टाटा, अब्राहम लिंकन, सिंधुताई सपकाळ, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रातूनही आपण कशी प्रेरणा घेऊ शकतो हे सांगितले.
युवकांनी स्वतःच्या भविष्याचे कल्पनाचित्र तयार करून, ध्येयनिष्ठ भावनेने ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे मत डॉ. वंदना महाजनी यांनी व्यक्त केले. विवेकानंदांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी एखादा कृती कार्यक्रम विद्यार्थ्यानी राबवावा असे आवाहनही त्यांनी केले.
विवेकानंद केंद्र पिंपरी चिंचवडच्या केंद्र प्रमुख अरुणाताई मराठे यांनी ओंकार गायन करून वेबिनारची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल भुतडा या विद्यार्थिनीने केले. तर वेबिनारचे समन्वयक म्हणून वैष्णवी हर्णे या विद्यार्थिनीने काम पाहिले. या वेबिनारमध्ये संस्थेच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेचे विद्यार्थी व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.