हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमध्ये १७ फेब्रुवारी रोजी, अर्थशास्त्र विभाग आणि ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सरकारी खर्च आणि उत्पन्न याबाबतच्या तरतुदी वर चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुणे आणि साधन व्यक्ती यांची ओळख करून दिली. ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरमचे संचालक डॉक्टर रतिकांत रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची मुख्य कल्पना डॉक्टर रतिकांत रे यांनी मांडली. डॉक्टर विजय ककडे यांनी अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीवर भाष्य केले.
आधुनिक शिक्षण पद्धतीत सरकारने उचललेले हे सक्षम पाऊल आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. हनीफ शेख यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे ग्रामीण विकासाचा पाया आहे आहे हे ओळखून सरकारने या क्षेत्रावर विशेष भर देऊन काही नवीन योजना घोषित केल्या आहेत, या योजनांचा आढावा घेतला. सी.ए. फाउंडर ऑफ आर सेनापती आणि असोसिएट चे प्रमुख सी.ए. राजेंद्र सेनापती यांनी डिजिटल बँकिंग व करन्सी यांचे महत्त्व सांगितले. विविध क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी विशद केल्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची बिनधास्तपणे उत्तरे दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत खिलारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. देशाची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि पाहुण्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे सदस्य फुलचंद कांबळे आणि नयना शिंदे उपस्थित होते तसेच डॉ. विश्वास देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इम्तियाज सय्यद यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.