- महापालिका अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडले पिंपळे सौंदागरमधील महत्वाचे प्रश्न
- अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे दिले आश्वासन
पिंपरी, (दि. २३ फेब्रुवारी २०२२) : पिंपळे सौदागर हे स्मार्ट शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने विकसित केले आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून मोठी विकासकामे परिसरात राबविली आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही अपूर्ण तर, काही पूर्ण अवस्थेतेतील प्रकल्प रखडून ठेवली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत भाजपा चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी महापलिका आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेतली. दरम्यान, बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, नवीन पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनची कामे मार्गी लावावे तसेच अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करून परिसर रहदारीमुक्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
निवेदनात अध्यक्षा कुंदा भिसे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन मार्गावरील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण विकसित केले आहे. परंतु, ते नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. पिंपळे सौदागरमधील खेळाडुंसाठी हे क्रीडांगण लवकरात लवकर सरु करावे. तसेच, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. परंतु, त्या टाक्यांमधून पाणी वितरण व्यवस्था अद्याप सुरू केलेली नाही. जलवाहिनी भूमीगतीकरणाची कामे अर्धवट आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावीत. कारण, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी वितरण व्यवस्था सुरळीत झाली तर त्याचा नागरिकांना फायदा होईल. अन्यथा कडक उन्हाळ्यात धरणामधून शहराला होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात झाल्यास या टाक्या सुरू करूनही काही उपयोग होणार नाही. कारण, पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास मुबलक पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.
पिंपळे सौदागर परिसरातील लष्करी परिक्षेत्राच्या भींतीलगत डीपी रोड विकसित करण्याचे काम सुरू आहे.. या रस्त्याचे काम पूर्ण केल्यास कुणाल आयकॉन, रोज वूड, अलकॉव्ह सोसायटी, काटे वस्ती व इतर सोसायट्यांचा रहदारीचा प्रश्न सुटेल. या रस्त्यामुळे शिवार चौकात होणा-या वाहतूक कोंडीचाही प्रश्न कायमचा सुटेल. पण प्रथम, डीपी रस्त्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. तसेच, पी. के. चौकातील रस्त्याच्या कामामुळे त्याठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तेथील अर्धवट कामे लवकरात लवकर मार्गी लावून वाहतूक सुरळीत करावी. तसेच, ट्रिओस सोसायटी आणि जुलेलाल सोसायटीच्या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशा मागण्याचे निवेदन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे याना दिले. अतिरिक्त आयुक्तांनी प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन ती कामे त्वरित मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन कुंदा भिसे यांना दिले.