एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

हेरंब कुलकर्णी

आज मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मनसे ज्या दिवशी स्थापन झाली, तो दिवस अजूनही आठवतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक स्वप्न राज ठाकरेंनी दाखवले. खेड्यापाड्यातून शिवाजी पार्कला गाड्या भरून गेल्या होत्या आणि डोळ्यात लकाकी घेऊन खेड्यापाड्यातली मुले गावाकडे आली होती. १३ आमदार निवडून आल्यावर त्या स्वप्नाला धुमारे फुटले आणि पुढे व्हाया मोदी, व्हाया पवार, व्हाया फडणवीस असा आजपर्यंतचा प्रवास समोर आहे.

असेच स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले होते. अशाच खेड्यापाड्यातून तरुणांच्या गाड्या भरून गेल्या होत्या. काँग्रेसमधून ते बाहेर आले याचा अर्थ कॉंग्रेसची सरंजामदारी संस्कृती दूर करतील आणि नवी राजकीय संस्कृती देतील असे वाटले होते पण सारे सहकार सम्राट शिक्षण सम्राट घराणेशाही सम्राट त्यांच्यामागे आले आणि काँग्रेसची भ्रष्ट आवृत्तीच हा पक्ष म्हणून समोर आला.

असेच स्वप्न आम आदमी पक्षाने २०१४ साली इथल्या तरुणांना दाखवले. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित कलावंत, निवृत्त अधिकारी निवडणुकीला उभे राहिले. सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण हातात घेतल्यावर राजकारणाचा चेहरा बदलण्याची खूप शक्यता निर्माण झाली, पण आम आदमी पक्षाच्या दिल्लीच्या कार्यपद्धतीने ते स्वप्नही धुळीला मिळाले. आज त्या पक्षाला नेता नाही की चेहरा नाही, अशी महाराष्ट्राची स्थिती आहे.

असेच स्वप्न प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने दाखवले. चांगली बांधणी केली आणि दलित आदिवासी भटके विमुक्त यातील तरुणांना राजकीय ओळख मिळाली. ते सारे अतिशय उत्साहाने स्वखर्चाने भाकरी बांधून राजकारण करू लागले. महाराष्ट्राची सत्ता खऱ्या अर्थाने वंचित बहुजनच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली. पडद्यामागच्या घडामोडी कधीच समोर आल्या नाहीत पण बटन बंद केल्यावर दिवा जावा, इतक्या सहजपणे इतक्या कष्टाने बंद केलेला पक्ष हळूहळू ओसरत गेला.

या साऱ्या निराशेच्या हिंदोळ्यावर समान मुद्दा हाच आहे की नवा राजकीय पक्ष निर्माण करून राजकीय संस्कृती मात्र बदलत नाही. घराणेशाही सरंजामदारशाही व आजच्या प्रस्थापित पक्षांपेक्षा संपूर्ण नवा पर्याय महाराष्ट्राला हवा आहे.

भाजपा सेना विरुद्ध काँग्रेस या सामन्याऐवजी आता भाजपा विरुद्ध काँग्रेस सेना हा सामना महाराष्ट्रात होत आहे. त्याला पुरोगामी व प्रतिगामी ही लेबले लावली तरीसुद्धा राजकीय संस्कृती म्हणून दोघांमध्ये काहीच फरक नाही. घराणे शाही सरंजामदार शाही भ्रष्टाचार कमी अधिक प्रमाणात दोन्हीकडे ही आहे व त्या सूडचक्रात महाराष्ट्राचे राजकारण भरडले जात आहे.

या संकुचित राजकारणापलीकडे महाराष्ट्र खूप खूप मोठा आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांना आज कोणताच राजकीय पक्ष स्पर्श करत नाही. आदिवासी भागातल्या समस्यांना कवेत घेईल असे आकलन कोणत्याच पक्षाच्या राजकीय नेत्याचे नाही. खेड्यातील बेकार तरुणांचे प्रश्नाला थेट कोणीच भिडत नाही.

त्यामुळे कोरा करकरीत नवीन राजकीय पर्याय शप्पथ महाराष्ट्राला हवा आहे, परंतु तो राजकीय संस्कृती बदलणारा असला पाहिजे. इतर पक्षांची भ्रष्ट नक्कल नको आहे. पंजाबमधील निवडणुकीत आम आदमी पक्ष जिंकल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न पाहिले जाईल, परंतु कॉंग्रेसचे हायकमांड व आम आदमी पक्षाची दिल्लीची हायकमांड यामध्ये फारसा गुणात्मक फरक नाही. केजरीवाल यांचा स्वभाव अनाकलनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आम आदमीच्या बाजुला जाताना अनेकदा विचार करतील. तेव्हा ग्रामीण प्रश्नांचे आकलन चेहरा आणि नवी राजकीय संस्कृती असा एक पक्ष महाराष्ट्र हवा आहे. रिपब्लिकन पक्षाकडून निराश झालेला तरुण, शेतकरी संघटना शक्तिहीन झाल्यानंतर राजकीय पर्याय शोधणारा हा तरुण सोशल मीडिया वापरणारा खेड्यापाड्यात आणि आणि शहरी भागातला तरुण याला शप्पथ पर्याय हवा आहे. महिलांच्या ग्रामीण महिलांच्या वेदनेला साद घालणारा पक्ष शप्पथ हवा आहे. असा राजकीय पर्याय हा व्यक्तीच्या भोवती फिरणारा नसेल तर सामूहिक नेतृत्वचा असेल पण तो प्रयोग आता व्हायला हवा. शप्पथ महाराष्ट्राला तिसरा पर्याय हवा आहे.