आकुर्डी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पक्षाच्या वतीने आकुर्डी येथे चेतन बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, यामध्ये स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी पक्षाच्या मागील वर्षातल्या विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या कष्टकरी महिलांचे योगदान व कार्य लक्षात घेता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत विविध सामाजिक उपक्रमात आपले योगदान देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तसेच स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबद्दल उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे वेगळेपण यात दिसून आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम इंदुमती पुन्नासे, माधुरी अरणकल्ले व संगीता थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हातातील सत्ता आणि लोकशाही व्यवस्थेत लोकांना मिळालेले अधिकार आणि कर्तव्ये यांच्याबद्दल माहिती देत, राज चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना चेतन बेंद्रे यांनी सध्याच्या देशातील परिस्थितीवर परखड भाष्य करत, आजच्या प्रजासत्ताक भारतामधील राज्यकर्त्यांनी फक्त सत्ता न राबवता प्रजेच्या, जनतेच्या कल्याणासाठी ती राबवण्याचे अपेक्षित असताना, तसे होताना दिसत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
आम आदमी पक्षातर्फे विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम देशभर होत आहे. स्थानिक पातळीवर देखील हे काम सुरू आहे व येत्या काळात अजून वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोबतच पक्षातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत येणाऱ्या काळामध्ये त्यात भर घालण्याचा मनोदय त्यांनी सांगितला व स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्यांना हात घालत, त्यांचे प्रश्न सरकार व सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवत ते सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील सर्व कार्यकर्ते तसेच आकुर्डी निगडी परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली, उपस्थितांच्या सकारात्मक चर्चेसोबत चहापानाच्या छोट्याच्या कार्यक्रमाने सांगता झाली.