- रामदास आठवलेंच्या घोषणेला मोदी सरकार महत्व देते का? डॉ. राऊत यांचा सवाल
- वेशीवर लक्तरे टांगली गेल्यानंतर केंद्राला पश्चातबुद्धी- डॉ. राऊत
- आंबेडकर फाउंडेशनचे “ते” उत्तर संतापजनक – डॉ. राऊत
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनला अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचे नाव माहिती नसावे यावरून या फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचे वास्तव आणि केंद्र सरकारचा वैचारिक पूर्वग्रहदूषितपणा स्पष्ट होतो,अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेत असल्याने त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी असावी,अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अण्णाभाऊ साठेंना महापुरुष मानण्यास नकार देऊन केंद्र सरकारने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोट्यवधी अनुयायांचा अवमान केला आहे, अशी संतप्त भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जनमानसात आपल्या साहित्याद्वारे पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या महामानवांच्या यादीत समाविष्ट केले जावे यासाठी महाविकास आघाडी सरकार पाठपुरावा करेल,असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्यातील पुरोगामी व प्रबोधन परंपरेतील सर्व संत,समाजसुधारक आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सर्व महामानवांची माहिती लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळविले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांनी केंद्र सरकारच्या या दलित शोषित विरोधी मानसिकतेची लक्तरे वेशीवर टांगल्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा म्हणजे धूळफेक करण्यासाठी सारवासारव असून ही केंद्राला सुचलेली पश्चातबुद्धी असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नसल्याचे आणि ते महापुरुष नसल्याचे’ केंद्र सरकारच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनने माजी आमदार सुधाकर भालेराव यांना लेखी कळविले. त्यानंतर माध्यमातून ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ यांचे नाव महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा केली. मात्र आठवले यांच्या घोषणेला मोदी सरकार किती महत्व देते? आठवलेंची घोषणा खरी ठरेल का? असे प्रश्न उपस्थित करून डॉ. राऊत यांनी याबाबत शंका व्यक्त केली.
“फाउंडेशनचे उत्तर संतापजनक व अवमानजनक आहे. अण्णाभाऊ साठेंच्या क्रांतिकारी कार्याची उपेक्षा करण्याचा आणि आंबेडकरी चळवळ देशवासियांना कळू नये असा हेतू तर केंद्र सरकारचा यामागे नाही ना, ही शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एकीकडे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा विचार आपले साहित्य,पोवाडे आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातून जनतेत लोकप्रिय करणारे अण्णाभाऊ साठे यांचे नावही महामानवांच्या यादीत टाकायचे नाही,हा केंद्र सरकारचा दुटप्पीपणा आहे”,असेही ते म्हणाले.
” ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे,’ असं ठणकावत मनामनांत क्रांतीची ठिणगी पेटविणारे थोर साहित्यसम्राट, महान शाहीर अण्णाभाऊ साठे यांना केवळ भारतातच नव्हे जागतिक पातळीवर ओळखले जाते. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. असे असताना भारत सरकारचेच आंबेडकर फाउंडेशन त्यांना ओळखत नाही ही बाब संतापजनक असून या प्रकाराचा करावा तितका निषेध कमीच आहे.शोषण, अत्याचार आणि जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी साहित्यातून आवाज उठवला.त्यांचा हा संघर्ष कोट्यवधी दलित शोषित पिडितांसाठी आजही प्रेरणादायी आहे व केंद्र सरकारने त्यांना महामानव मानले नाही तरी ते आमच्यासाठी सदैव महामानव राहतील,” अशी भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.