इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा – नितीन यादव

इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा - नितीन यादव

पिंपरी : माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार मनपाचा वाल्हेकरवाडी (सेक्टर नंबर 32 निगडी) येथील दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्यामुळे तात्काळ पाडण्यात यावी, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे इमारत कोसळण्यापुर्वीच मनपाचा वाल्हेकरवाडी दवाखाना व व्यायामशाळा तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अडतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ साली बांधलेल्या सदर इमारतीचे २१ एप्रिल २०१६ ला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. सदर ऑडिट मध्ये इमारतीच्या पिलर, बीम, सिमेंट काँक्रीट, स्लॅब, सज्जे व आरसीसी मधील लोखंडी गज यांचे प्रयोगशाळेत भारतीय मानांकनानुसार तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत.

धक्कादायक खुलासे पुढीलप्रमाणे

१) इमारतीमधील सिमेंट काँक्रीटची ताकद पूर्णपणे संपलेली आहे

२) हेवी लिकेजमुळे लोखंडी सळ्या व तारांना गंज पकडला आहे

३) भिंतींना व स्लॅब ला अनेक ठिकाणी अनेक भेगा व तडे गेलेले आहेत.

४) इमारतीच्या देखभाली मध्ये प्रचंड दुर्लक्षपणा व गंभीर हलगर्जीपणा केलेला आहे.

५) आरसीसी कॉलम क्रॅक झालेले आहेत व त्यांची ताकद संपली आहे.

६) सज्जे खराब झालेले आहेत व वाककेले आहेत.

७) प्लंबिंग पाईप व ड्रेनेज पाईप अनेक ठिकाणी तुटलेले आहेत.

८) स्वच्छतागृहांमध्ये सर्वत्र पाण्याची गळती लागली आहे.

९) अंतर्गत व बाहेरील प्लॅस्टरची स्थिती अतिशय गंभीर व वाईट आहे.

१०) इमारतीचा वरील स्लॅब अनेक ठिकाणी गळत आहे भिंतींना भेगा पडल्यामुळे पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरलेले आहे.

वरील सर्व बाबींमुळे सदरची इमारत मानवी वस्तीसाठी अत्यंत धोकादायक असून भारतीय मानांकनानुसार सदर इमारतीची संरचनात्मक स्थिती आर्थिक दुरुस्तीच्या टप्प्याच्या पलीकडे इतकी खराब झाली आहे. त्यामुळे सदर इमारत संरचनात्मक दृष्टीने अत्यन्त असुरक्षित व मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे त्यामुळे यातील नागरिकांना बाजुला काढून ही ईमारत तात्काळ पाडण्यात यावी असे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्टमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष

सदर संदर्भात वाल्हेकरवाडी दवाखाना व्यवस्थापनाने इमारतीच्या धोकादायक स्थिती संदर्भात सन 2016 पासून अनेक वेळा अ व ब क्षेत्रिय कार्यालय तसेच मनपा मुख्य आरोग्य वैद्यकीयच वरिष्ठ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. तथापि क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य कार्यालय व्यवस्थापनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. सद्यस्थितीत ब क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाने फक्त वरवर डागडुजी व रंगरंगोटी केलेली आहे.

दवाखान्यामध्ये दररोज शेकडो नागरिक उपचाराकरता येत असतात. शिवाय या इमारतीतील व्यायाम शाळेत अनेक तरुण मुले व्यायामा करता दिवसभर येत असतात तसेच या दवाखान्यात मनपाचे जवळपास पंधरा वीस कर्मचारी अधिकारी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रामाणिकपणे नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत आणि कोरोना वाक्सिनेशनही याच ठिकाणी चालू आहे या सर्वांचा जीव सद्यस्थितीत अक्षरशः धोक्यात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करा

ऑडिट रिपोर्ट नुसार इमारतीची अंतर्गत संरचना अत्यंत नाजूक व धोकादायक स्थितीत आहे. तसे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे भविष्यात इमारत कोसळून मोठी जीवित हानी होऊ नये. यासाठी आपण सदर दवाखाना व व्यायामशाळा यांचे योग्य ठिकाणी तात्काळ स्थलांतर करावे अन्यथा भविष्यात जर का इमारत कोसळून जीवितहानी झाली तर याला पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची मा आयुक्तांनी गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती शिवाय या इमारतीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मध्ये इमारत अत्यंत असुरक्षित व मानवी वस्तीस धोकादायक असे स्पष्ट नमूद असताना सुद्धा सदर इमारतीवर तसा फलक कुठेही लावलेला नाही त्यामुळे या इमारतीमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांची व यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयुक्तांनी चौकशी करावी.