गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे

गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट - अजित गव्हाणे
  • भाजपचा हजारो कोटी लुटण्याचा डाव रोखण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) : अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत घातला जात आहे. भ्रष्टाचार करण्याच्या खटाटोपात पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर निविदा त्वरित रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या धक्कादायक प्रकाराबद्दल आपली भूमिका मांडताना अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या हितापेक्षा आपली तुंबडी भरून घेण्याच्या भाजप नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीवर कडाडून हल्ला केला. अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल इंटरनेट डक्ट तयार कऱण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता. महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच प्रसिध्द केली. अवघ्या तीन कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला. मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन, मेसर्स यु.सि.एन. केबल या दोन कंपन्यांशिवाय मेसर्स सुयोग टेलिमॅटिक्स लि. – मेसर्स फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि.या भागीदार कंपनीने निविदा भरली. सुयोग टेलिमॅटिक्स लि.- फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ट ठरली आणि त्यांना काम देण्याची घाई स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे. ज्या कंपनीकडे शहराचे पूर्ण नेटवर्क सोपविण्यात येणार आहे त्यासंदर्भात अत्यंत गंभीर मुद्दे समोर आले आहेत.

मे. सुयोग टेलीमॅटिक्स – मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. भागीदार कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ठ ठरवून ती निविदा मान्य करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कंपनी मधील मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. या कंपनीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आमच्या हातात आली आहे. सदर कंपनीचे सद्यस्थितीचे संचालक आसिफ अजीज शेख व चिन्मय अपुर्ब चटर्जी असल्याची माहिती रेजीस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्या संकेत स्थळावर आहे. रियाज अब्दुल अजीज शेख व ड्वेन मायकल परेरा या दोन संचालकांनी नोव्हेंबर – डिसेंबर २०२१ मध्ये संचालक पदावरून राजीनामे दिला. रियाज अब्दुल अजीज शेख व ड्वेन मायकल परेरा हे दोन्ही संचालक संस्थेच्या स्थापनेपासून संचालकपदावर कार्यरत आहेत. रियाज अब्दुल अजीज शेख, ड्वेन मायकल परेरा, अश्रफ अली, आसिफ अजीज शेख व फिरदौस रियाज शेख हे या कंपनीचे भागधारक आहेत. तसेच जबीन मुल्ला, रियाज अब्दुल अजीज शेख व ड्वेन मायकल परेरा हे सदर कंपनीचे विशेष भागधारक आहेत. ही सर्व माहिती शासनाच्याच संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

संचालकांचे पाकिस्तान, दुबई कनेक्शन ! दुबई आणि पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कातील तसेच बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्याचा आरोप असलेल्या रियाज अब्दुल अजीज शेख व ड्वेन मायकल परेरा यांना गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या गुन्ह्यात डिसेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. अहमदाबाद येथील डी.सि.बी. पोलीस ठाण्यात रियाज अब्दुल अजीज शेख व ड्वेन मायकल परेरा यांच्या सह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता याच लोकांशी संबंधित कंपनीकडे पिंपरी चिंचवड शहराचे केबल इंटरनेट कनेक्शन सोपविण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर आणि देशविघातकसुध्दा ठरू शकतो.

निर्णय झालाच तर ‘हा’ धोका अटळ! – गव्हाणे

पिंपरी चिंचवड शहरातील इन्टरनेट सारखी महत्वाची व अत्यंत संवेदनशील सेवा एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या हातात पडल्यास त्याचा दुरुपयोगच होणार यात शंका नाही. VOIP (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉल्स) हे GSM (मोबाइल कम्युनिकेशनसाठी ग्लोबल सिस्टम) कॉल्समध्ये रूपांतरित करतात. अशा प्रकारे VOIP चे GSM कॉल्समध्ये रुपांतरित करून खंडणीची मागणी बिनदिक्कत होऊ शकते. तसेच डाटा चोरून त्याचा माध्यमातून एखाद्याची मोठी आर्थिक फसवणुकही होऊ शकते. कदाचित त्यातून मोठमोठ्या वित्त संस्थांनाही धोका संभवतो. शहरातील नागरिकांच्या वैयक्तीक जीवनातसुध्दा ढवळाढवळ करुन एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणते देश विघातक कार्य देखील यातून घडू शकते.

स्थानिक बड्या नेत्याचा आशीर्वाद ?

सुयोग टेलिमॅटिक्स लि.- फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीलाच काम मिळावे यासाठी शहरातील एक स्थानिक बड्या नेत्याचा आग्रह असल्याची आमची माहिती आहे, असा मोठा गौप्यस्फोट अजित गव्हाणे यांनी केला. प्रकल्प सल्लागार आणि संबंधीत कंपनीचेही लागेबांधे असल्याचा संशय आहे. दोघे मिळून महापालिकेला फसवत आहेत. अशी देशविघातक प्रवृत्ती वेळीच ठेचायला पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मुख्य पक्ष प्रवक्ते योगेश बहल, मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट,कार्याध्यक्ष राहुल भोसले, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रवक्ते विनायक रणसुभे, माजी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेविका मंदाताई आल्हाट इत्यादी मान्यवरांचा अनेक पदाधिकारी उपस्थित होते.