राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, दि. २० डिसेंबर : लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन मध्ये खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघिरे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, निरीक्षक शितल हगवणे, माजी महापौर मोहिनी लांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे, राहुल भोसले, युवक अध्यक्ष इमरान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, स्वाती काटे, उषा काळे, विश्रांती पाडाळे, सुरेखा लांडगे, अमिना पानसरे, कविता खराडे, पुनम वाघ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे, संगीता कोकणे, ज्योती गोफणे आदी महिला कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना वैयक्तिक आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावयास हवी. या शिबिरातील कॅन्सर तपासणी बाहेर करावयाची झाल्यास महिलांना जास्त पैसे मोजावे लागतात, परंतु, शहर महिला कार्यकारिणीने समाजातील महिलांसाठी या तपासणी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारची तपासणी शिबिरे शहरात निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून दिला पाहिजे.” असेही त्या म्हणाल्या. या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट व त्यांच्या महिला कार्यकारिणीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी केले. सूत्रसंचालन पुनम वाघ यांनी तर समारोप आभार कविता खराडे यांनी मानले. सदर शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.