जेट जगदीश
अफवा पसरवणे जर गुन्हा आहे, तर व्रत आणि उपवासाच्या ज्या पोथ्या आहेत त्यातील खोटा आशावाद पसरवणाऱ्या भाकड कथा या अफवा नाहीत का? सत्यनारायण कथा, लक्ष्मीव्रत कथा, संतोषी माता व्रत कथा, सोळा सोमवार, सोळा गुरुवार, सोळा शुक्रवार च्या पोथ्या अफवा नाहीत का? कारण त्यात सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या मनोकामना कधीच पुऱ्या झालेल्या आजतागायत दिसल्या नाहीत. मग ह्या पोथ्या लिहीणाऱ्या लेखकांनी अफवा पसरवण्याचा गुन्हा केला नाही काय? पोथी वाचणार्या भक्तांकडे क्वचितच धनधान्य, समृद्धी आली असेल. पण पोथी न वाचणाऱ्या या प्रकाशकांनी धर्माच्या नावाखाली पोथीच्या आधारे कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाने मात्र खोऱ्याने पैसे ओढून स्वतःचे मात्र कल्याण केले!
या पोथ्यातील कथांना खरे समजल्यामुळे प्रत्यक्षात नरबळी दिले गेले आणि अनेक भक्तांनी ही व्रते वा पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या मोक्षाच्या अफवांमुळे आत्महत्या केल्या आहेत. म्हणून या पोथ्यांच्या लेखक आणि प्रकाशकांना IPC च्या ४२० कलमाखाली अटक का करू नये?
या पोथीवाल्याना त्यांनी लिहिलेल्या पोथीतील एक तरी माहिती खरी आहे हे सिद्ध करायला बाध्य करा. आणि त्यांना ते करता येत नसेल तर त्यांच्यावर पोलिस केस करा त्यांना कायद्याचा बडगा दाखवा.
लोकांना दैववादी बनवत अफवा पसरवणाऱ्या या पोथ्यांवर कायद्याने बंदी आणाण्यास भाग पाडा किंवा त्या पोथ्यांवर हे सर्व काल्पनिक असल्याचा वैधानिक इशारा लिहायला भाग पाडा. सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट पिणे आरोग्यास धोकादायक असते’ असा वैधानिक इशारा असतो, त्याप्रमाणे या सगळ्या पोथ्यांवर ‘यातील कथांचा वास्तव जीवनाशी काही संबंध नाही’, असे पोथीच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात लिहिण्याचे बंधन घाला.
माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अंधश्रद्धा जीवाला घातक असतात. तेव्हा धर्माच्या कर्मकांडी अंधारातून बाहेर पडा; आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून विवेकी विचारांच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात आपल्या आयुष्याची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू करा.