मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. मात्र, अ‍ॅड पाटील यांचा हा आरोप निराधार असल्याचे लोकमराठी न्यूजच्या पडताळणीत पुढे आले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

कायदा काय सांगतो?

केंदीय गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय ध्वज संहिता २००६, कलम सहा (सलामी) म्हटले आहे की, ध्वजारोहण करण्याच्या अथवा ध्वजावतरणाच्या प्रसंगी अथवा एखाद्या संचालनामधून ध्वज नेण्यात येत असताना अथवा पाहणी करीत असताना उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे रहावे, गणवेशात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला उचित रीतीने सलामी द्यावी, जेव्हा ध्वज दलाबरोबर नेला जातो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती, तो समोरुन नेला जात असताना, सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा सलामी देतील. उच्चपदस्थ व्यक्तीला शिरोवस्त्र (head dress) न घालता सलामी घेतली तरी चालेल.

दरम्यान, संबंधित कायद्यानुसार अ‍ॅड पाटील यांची तक्रार निराधार असून त्यांनी तक्रार करण्यापुर्वी यासंदर्भातील कायद्याची तपासणी केली नसल्याचे दिसत आहे. तसेच अ‍ॅड पाटील यांनी केलेली ही तक्रार प्रसिद्धीस येण्यासाठी केली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.