बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता ८ जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपल्या फेसबुक पेजवरुन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी बदनामी केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने वाकड पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravi Shankar) यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आले होते.
मात्र, अहमदनगरमधील एका खटल्याच्या निकालात न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. याचा दाखला देत सतिश काळे यांनी सदरील वादग्रस्त व्हिडिओ तात्काळ हटवून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे तब्बल दोन वर्षांपासून पाठपुरावा चालू ठेवला.
यासंदर्भात काळे यांनी वाकड पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. तसेच काळे यांनी पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी कायदेशीर मार्गाने आंदोलने केली. यामध्ये रस्ता रोको, धरणे आंदोलन, मुंडन आंदोलन, श्राद्ध आंदोलन, ठिय्या आंदोलन तसेच उपोषणे केली. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना समक्ष भेट घेत त्यांचेकडेही तक्रार केली. तरी देखील यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे सतिश काळे यांनी श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुणे सत्र न्यायालयात दाद मागितली होती.
काळे यांचे म्हणणे ऐकून घेत तसेच सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी ०७ जुलै २०२२ रोजी वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम २०२ अंतर्गत तपास करुन तात्काळ अहवाल सादर आदेश दिले आहेत. सतिश काळे यांच्या वतीने ॲड तोसिफ शेख, ॲड क्रांती सहाणे, अॅड दीपक गायकवाड, अॅड स्वप्नील गिरमे, ॲड मोहम्मद शेख, अॅड महेश गवळी, अॅड शिवानी गायकवाड, अॅड नुपूर अरगडे, अॅड राम लोणारे पाटील यांनी काम पाहिले आहे.