आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला

आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला

अहमदनगर : पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास भूभागावरून करीत अरबी समुद्रात जाणार आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे, याकडे दुर्मिळ घटना म्हणून पाहिले जात आहे.

तत्पूर्वीच उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोचले आहे. चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली. परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले. त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान तयार झाले. त्यात चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने, येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. हवामानातील हे बदल अनाकलनीय असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या १०० वर्षांतील पाऊस व त्याच्या प्रवासाच्या ठळक नोंदी आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात गेल्याची एकही घटना नोंदलेली नाही.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मंगळवारी (ता. १३) बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे (ता. १५) जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईत पोचेल.

दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करील. त्याचा वेग ताशी शंभर किलोमीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे सोमवारपासून (ता. १२) शनिवारपर्यंत (ता.१७) हवामान ढगाळ व दमट राहील. दक्षिण नगर जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) अधिक पावसाची शक्‍यता आहे.

या प्रवासात वादळाचा चक्राकार वेग ताशी २५ किलोमीटर, तर पुढे सरकण्याचा वेग ताशी १०-१२ किलोमीटर राहील. मुंबईतून अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ वेगाने कराचीकडे जाईल. मात्र, मुंबई व कोकणपट्टीत अधिक पाऊस होईल. राज्यातील सर्वच भागात येत्या १३ ते १८ ऑक्‍टोबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्‍यता आहे.

जलसंपदा विभागाकडे गेल्या शंभर वर्षांतील पर्जन्यमानाच्या नोंदी तपासल्या. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याची घटना सहसा घडत नाही. यंदा तेथे निसर्ग चक्रीवादळ तयार झाले. त्याने कोकणपट्टीची हानी केली. ही दूर्मिळ घटना आहे.

हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दुसऱ्या दुर्मिळ घटनेची नोंद व्हायला सुरवात झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी अरबी समुद्रातून विशाखापट्टणम किनारपट्टीवरून निघालेले चक्रीवादळ नांदेड व्हाया नगर, पुणे असा प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे. तसे झाले, तर ही गेल्या शंभर वर्षांतील दुसरी दुर्मिळ घटना असू शकेल. त्यामुळे 18 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस होऊ शकतो.

– उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग