पुणे : देहुरोड छावणी परिषदमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असलेले रंधीर किसनलाल बांधल यांचा कोरोना विषाणूच्या (कोविड १९) संसर्गामुळे मृत्यु झाला. संबधित कर्मचारी यांच्यावरच कुटूंबाची उपजिवीका अवलंबून असल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला ५० लाखाची विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहुरोड छावणी परिषदेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी देहुरोड छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असणारे वैदकीय तज्ञ पॅरामेडीकल स्टाप व सफाई कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहेत. त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या-थाळ्या वाजवून सन्मान करण्याचे आवाहन केले, तसेच अशा कोरोना योद्धयांना कर्तव्यावर असता ५० लाखाचे विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे देहुरोड छावणी परिषदेमध्ये कर्तव्यावर असणारे सफाई कर्मचारी रंधीर किसनलाल बांधल यांचा कोरोनीमुळे मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटूंबाला विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहुरोड छावणी परिषदेने आर्थिक मदत करावी. असे निवेदनात म्हटले आहे.