विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन

विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन
  • डॉ. आंबेडकर महाविद्यालयात “Thanks a Teacher अभियान” उपक्रम संपन्‍न

पुणे : चालू काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही व्हायला पाहिजे. तसेच उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त “Thanks a Teacher अभियान” उपक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे बोलत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी पाहुण्यांची प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वार्तालाप केला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या covid-19 च्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने शिक्षक दिन साजरा होत आहे. खरंतर ही एक आधुनिक युगाची नांदी ठरावी. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. अशा त्या म्हणाल्या.

आपली शिक्षकी पेशात येण्यासाठी मागची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थीदशेत असताना आपण अनेक वकृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचो. तसेच डॉ. भीमराव कुलकर्णी सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे खंड विकत घेण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक ग्रंथ जमवण्याचा छंद लागला. त्यानंतर ‘ग्रंथ हेच गुरु’ असे मानून मी आजपर्यंत अनेक ग्रंथलेखन केले. तसेच लेखक-प्रकाशक आणि लेखक-पुस्तक यांच्यातील मैत्री वृद्धिंगत व्हावी. अशा हेतूने स्नेहवर्धन प्रकाशन संस्था सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घरोघरी जाऊन ज्ञानाची गंगा पोहोचविली. आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनले. शिक्षकाच्या हातूनही अनेक विद्यार्थी घडतात. तसेच आपल्या हातूनही विद्यार्थी घडविण्याचे काम घडावे. अशा हेतूने आपण शिक्षकी पेशाकडे आल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहवर्धन इन्स्टिट्यूट मार्फत आजपर्यंत बावीस देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या परिषदा घेतल्या असून, त्यासंदर्भातील आपला अनुभव व्यक्त करताना त्या म्हणाल्या मॉरिषेस या देशांमध्ये अनेक मराठी भाषिक लोक राहतात. तसेच शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषेमधून शिक्षण दिले जाते. त्यामुळे आपण सर्वांनी बहुभाषिक व्हायला पाहिजे. असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे म्हणाले की, covid-19 या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षक जे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यावरून असे दिसते की, शिक्षकाकडे खूप सामर्थ्य असते. प्रत्येक दिवशी येणार्‍या नव्या प्रश्नांना सोडवण्याचे काम आजचा शिक्षक करीत आहे. शिक्षकाने आपल्यातील सामर्थ्याचा वापर केला तर समाज परिवर्तन होऊ शकेल. covid-19 या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवरही शिक्षक आपले ज्ञानदानाचे कार्य ऑनलाईन पद्धतीने करीत आहेत. खरतर ही गोष्ट कौतुकास्पद आहे. शिक्षकांमध्ये समाज परिवर्तनाची शक्ती असते. त्या ऊर्मीच्या आधारे आजचा शिक्षक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करीत, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे निश्चितच समाज परिवर्तन होईल असा अशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी विभागाचा “विश्वकोश दर्शन” उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे यांनी विविध विषयावरील विश्वकोशाची माहिती देत. ते ऑनलाईन पद्धतीने कसे पाहता येतात. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

इंग्रजी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या “word of the day” या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सविता पाटील यांनी त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बीए, बी.कॉम, बी.बी.ए.(सी.ए.), एम.ए., एम.कॉम. या वर्गातील 750 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने “Thanks of Teacher अभियान” या उपक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी करून दिली. तर कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.