शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे

शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे - डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे
  • शिक्षक दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न

पिंपरी : शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. कॅप्टन.सी.एम.चितळे यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘कौशल्य विकासात शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा बदलाचा महत्वपूर्ण घटक असून शिक्षकांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अध्यापन शैलीद्वारे अभ्यासाला पोषक वातावरण निर्मिती करण्याची कला अवगत करायला हवी. सध्या इंटरनेटमुळे माहितीचा प्रचंड साठा अवघ्या एका क्लिकवर सहज उपलब्ध होत असताना आपण विद्यार्थ्यांना वेगळे काय शिकवू शकतो, कशा पद्धतीने शिकवू शकतो याचा विचार सर्व शिक्षकांनी करायला हवा. प्रभावी अध्यापनासाठी पाच-दहा विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट तयार करून सातत्याने त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांमार्फतही अभ्यासक्रम शिकविला जाऊ शकतो,असेही डॉ. चितळे यांनी सांगितले.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना डॉ. चितळे यांनी विविध उदाहरणांसह अनुभवाचे दाखले देत शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत करण्यासाठी अवांतर वाचन करावे, नवनवीन गोष्टी समजून घ्यावात, अध्यापनाची नवीन तंत्रे आत्मसात करावीत तसेच आपल्या शिकविण्यात नावीन्यता कायम राहील याबाबत सजग राहावे असे सांगितले.

या वेबिनारमध्ये ‘यशस्वी’ संस्थेच्या कौशल्य विकास विभागासह इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स व महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, संतमाई स्किल डेव्हल्पमेंट सेंटर, हॉटेल मॅनेजमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर व समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांसह संस्थेचे सर्व विभागाचे संचालक व केंद्र प्रमुख सहभागी झाले होते. वेबिनारचे समन्वयन व प्रास्ताविक संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे जनसंपर्क प्रमुख योगेश रांगणेकर यांनी केले.