- “प्राधिकरण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…बाहेरचे हटाव, प्राधिकरण बचाव…” घोषणांनी दणाणला परिसर
मुंबई : एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरणामध्ये द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीने प्रचंड गाजले. मागील तीन वर्षांपासून आयुक्त आर. ए. राजीव यांनी एकदाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबधी संघटनेला चर्चेला वेळ दिला नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.काही दिवसांपूर्वी द्वार सभेची संघटनेने नोटीस देऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही,याबद्दलचा राग सर्वांच्या मनामध्ये धगधगत होता, हे आजच्या प्रसंगी दिसून आले.
प्राधिकरणाची ढासळती अर्थव्यवस्था याबद्दल सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी सुरक्षा योजना व सेवनिवृत्तीं नंतर वैद्यकिय सुविधा या योजना राबविण्यात येत नाहीत,याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच बाहेरील व सेवानिवृत्त मंडळींना विविध विभागातील प्रमुख पदांवर दिलेली नियमबाह्य नियुक्ती यांमुळे आंदोलक कर्मचारी,अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.
प्राधिकरण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे… बाहेरचे हटाव, प्राधिकरण बचाव… या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या अगोदर सदर आंदोलनाची गरज कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, महापौर किशोरी पेडणेकर आणि विविध नेत्यांना सांगितली होती. या लढयास विविध कामगार व राजकीय संघटनांनी आपला पाठिंबा घोषित केला होता. द्वार सभेच्या माध्यमातून आत्ता तरी प्राधिकरण वाचविण्याची आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची
महानगर आयुक्त यांना विनंती देखील करण्यात आली. ही भूमिका जर महानगर आयुक्तांनी घेतली तर आम्ही देखील दोन पावले पुढे येऊन सहकार्य करू असेही आजच्या सभेत घोषित करण्यात आले.
या सभेमध्ये संघटनेच्या वतीने सिद्धार्थ सत्वधीर, शांताराम चाळके, विद्या कोटक, सुबोध सुर्वे व विलास पवार यांनी प्रशासनाच्या मनमानी विरोधात तोफ डागली. या समस्यांचे निराकरण लवकर झाले नाही तर आंदोलन यापुढेही चालू राहील,असे आजच्या द्वार सभेत ठरविण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन राजेश दाभोळकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष गांगुर्डे यांनी केले.