- मशिनमध्ये बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी केले मान्य
सातारा (लोकमराठी) : सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर कोणतेही ईव्हीएम मशिनचे कोणतेही बटन दाबले दाखल तरी मतदान कमळाला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. त्यामुळे तेथे नवीन मशिनवर पुढील मतदान घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्याने त्यांना बॅलेट दिला; परंतु मतदान करण्यापूर्वी कमळाच्या चिन्हापुढील लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. असाच प्रकार आम्ही मतदान करतेवेळी झाल्याचे रोहिणी दीपक पवार, आनंदा ज्ञानेश्वर पवार, माजी उपसरपंच सयाजी श्रीरंग निकम, प्रल्हाद दगडू जाधव, दिलीप आनंदा वाघ यांनी निवडणूक अधिकाऱ्यास सांगितले. घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबले, तरी मतदान कमळास होत असल्याची बाब ग्रामस्थांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखी तक्रार देत मतदान प्रक्रिया थांबविली. त्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळपासूनच पोलिंग एजंटसह मतदार याबाबत शंका व्यक्त करीत होते. मात्र ही बाब सुरवातीला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क केला असता आमदार शशिकांत शिंदे तेथे पोचले. त्यांनी मतदार, कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांना मशिनवर प्रत्यक्ष मतदान करून खात्री करण्यास सांगितले. त्या वेळी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबल्यास कमळ चिन्हापुढील लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा प्रकार पुन्हा घडला. त्यानंतर मशिनमध्ये बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. हे मशिन सील करून पुढील मतदान नवीन मशिनवर घेण्याचे ठरले. मात्र, तोपर्यंत 291 मतदान झाले होते. संतप्त कार्यकर्ते फेरमतदानाची मागणी करू लागले. मात्र, आमदार शशिकांत शिंदे, युवा नेते तेजस शिंदे यांनी त्यांची समजूत घातल्याने वातावरणातील तणाव निवळला.