यवतमाळ : महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झालेल्या केळापूर तालुक्यातील पहापळ येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सरकारचा निषेध नोंदवित आत्महत्या केली. धनराज बळीराम नव्हाते (वय ५२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती होती.
धनराज बुधवारी सकाळी हिंगणघाट तालुक्यात मुलीकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र ते मुलीकडून परतून घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आढळेल्या चिठ्ठीवर कर्जासाठी आत्महत्या असा उल्लेख आहे.
निसर्ग साथ देत नाही, व्यापारी भाव देत नाही, शासन मदत करीत नाही, असेही त्यात लिहिले आहे. याच चिठ्ठीत त्यांनी या सरकारचा धिक्कार असो असाही उल्लेख केला आहे. या चिठ्ठीमुळे राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या नेत्यांनी पहापळ येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.