- वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना स्वतःच्या आश्वासनाचा विसर? | कोरोना योद्ध्यांची ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी दूरावस्था का?
- आंदोलन अधिक तीव्र करणार!…आंदोलकाचा इशारा!
मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : जेजे हॉस्पिटलमधील महाराष्ट्रातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस. परंतु शासन दरबारी आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिलेल्या कोरोना योद्ध्यांकडे सरकार दुर्लक्षित करत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना स्वतः त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असे दिसते.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी वारंवार निवेदन देऊनही, सेवा नियमित करण्याचा न्याय शासन देत नाही, हे दिसल्यानंतरच आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत. जे जे रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासून आदोलन सुरू आहे. मात्र, सरकारतर्फे कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही, हे कोरोना योद्ध्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक अस्वस्थ झालेले दिसत आहेत. कोरोना काळात याच अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना कोरोना योद्धा म्हणून नाम मात्र गौरवण्यात आले. परंतु, सेवा नियमित करण्याचे आश्वासन फक्त बोलण्यापुरते राहिले काय? वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्वतः वारंवार आश्वासन दिले आहे. परंतु, निर्णय मात्र होत नाही, त्यामुळे शासन स्तरावर कोण अडवणूक करत आहे. याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
‘गरज सरो वैद्य मरो’ अशी आपल्या कोरोना योद्ध्यांची अवस्था झाली आहे की काय? अशी चर्चा वैद्यकीय शिक्षण विभागात होत आहे, आणि म्हणूनच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या तर्फे देण्यात आला आहे.