संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे

संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे - प्रा. बी. बी. शिंदे 

चिंचवड, ता. २६ : आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, खरे बोलणे हा देशद्रोह ठरवला जात आहे. शिवाय हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. जेव्हापासून देशात संविधानाचा आमल सुरू झाला, तेव्हापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच तर आहेत. मग यांना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे. यांना हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे राष्ट्र निर्माण करून, भारतीय संविधान बाजूला करावयाचे आहे. हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवून, त्यांना खऱ्या अर्थाने सतेतून दूर करणे आवश्यक आहे. त्याकरिता या देशातील सर्व भारतीय नागरिकांनी सम विचारांनी आपले सर्व गट तट, विविध पक्ष, संघटना, विसर्जित करून, या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळणे कामी, सर्वांनी या विषमतावादी शत्रूचा नायनाट करणेसाठी, सर्वांनी मिळून, एकत्रित लढा लढण्याची काळाची गरज आहे. हीच खरी या रयतेच्या राजाला मानवंदना ठरेल. असे प्रतिपादन सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संगटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज यांच्या १४९ जयंतीनिमित्त संघटना माध्यमातून चिंचवडमधील केएसबी चौकातील शाहू राज्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित समूहाला संबोधित करताना प्रा. शिंदे बोलत होते.

याप्रसंगी सामाजिक संघटनेचे सचिव लक्ष्मण सिरसाट, सह संघटक रामभाऊ ओव्हाळ, बाळासाहेब जाधव, अशोक जावळे यांच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, पूर्वी ज्या मानसिकतेने रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवराय यांना छळले. त्याच मानसिकतेतून शिवरायांचे वारसदार म्हणून शाहूमहाराज यांना टिळक महाशय धेडोंका राजा म्हणत असत. कारण शाहुजी महाराज यांनी समतेचा पुरस्कार करून, विषमतेचा तिरस्कार करून, मनुवादी, वैदिक मानसिकतेला झुगारून दिले होते. जे जे वैदिकांना नको आहे, ते ते शाहू महाराजांनी रयतेच्या, बहुजनांच्या उद्धारासाठी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान लिहण्यासाठी जी शैक्षणिक बुद्धिमत्ता लागणार होती, त्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक परिपक्वतेसाठी आर्थिक मदत देऊन, या महामानवाला उभारण्याचे महान, अति मोलाचे सहकार्य केले.