Lok Marathi News Network
पिंपरी चिंचवड : कान्होपात्राला क्लिओपात्रा करण्याचे स्वप्न दाखविणा-या मोजक्या भांडवलदारांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था केंद्रीत होत आहे. देशामध्ये व्यक्ति, पक्ष महत्वाचा नसून देशातील 90 टक्के संपत्ती 10 टक्के भांडवलदारांच्या हातात जात आहे. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. देशाला सनातनी, धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादापासून वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार आहे, असे प्रतिपादन रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे केले.
ज्येष्ठ नगरसेवक व पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 एप्रिल) ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत शहरातील साहित्य, कला, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेवक अतुल शितोळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, सचिन इटकर, किरण गुजर, सागर कोल्हे, प्रा. तुकाराम पाटील, विलास देसले, रविंद्र डोंबाळे, अंकुश आरेकर, अनिल दिक्षित, तुकाराम सातपुते, इंद्रजित घुले, राज अहिरराव, राजन लाखे, संतोष रासणे, तेजश्री अडिगे, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते.
फुटाणे म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षामुळे अच्छे दिन येणार नाहीत. पाच-दहा हजारांसाठी बळीराजा आत्महत्या करतो तर हजारो कोटी रुपये बुडवून मल्ल्या व मोदी परदेशात परागंदा होतो. पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता कवितेतून ‘त्याने एक उंच पुतळा उभारला आणि पुतळ्यामुळे आपली उंची किती वाढली हे शोधण्यात चार वर्षे घालविली’ अशी टिका फुटाणे यांनी केली. तुकाराम सातपुते यांनी ‘दोन भामटे एक दामटे राजकीय बागायतदार झाले म्हणून देशाचे सहकारमहर्षी चौकीदार झाले’; अंकुश आरेकर यांनी ‘लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून यांची जीभ ‘साला’ म्हणण्यास कशी रेटली, विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो काय?’; अनिल दिक्षित मोदी भक्तांवर टिका करताना म्हणाले की ‘चोर आम्ही चौकीदार आम्हाला काय कुणाची भिती, देव देश बँक लुटण्यापायी कमळ घेतले हाती, धमकावं का धरून हेच आम्हाला ठावं लुटून पळावं पळून सुटावं पक्षामध्ये घुसावं पाच वर्षे मग हे लुटण्याच परमिट असावं’ अशा शब्दांतकाव्यातून व्यवस्थेवर टिका केली.
मेघराजे भोसले म्हणाले की, जीएसटीमुळे सांस्कृतिक क्षेत्र व चित्रपट व्यवसाय मोडकळीस आला आहे. जीएसटीचा आर्थिक बोजा प्रेक्षकांवरच पडतो. यापूर्वी मराठी चित्रपटांना ताबडतोब एकरकमी मिळणारे अनुदान युती सरकारच्या काळात टप्प्या टप्प्याने तुटपुंजे दिले जात आहे. जीएसटीमुळे मराठी चित्रपटाचे तिकिट दर वाढल्याचा परिणाम तरुण पिढी हिंदी चित्रपटाकडे आकर्षित होण्यास झाला. या सरकारातील सांस्कृतिक मंत्र्यांना या क्षेत्राबाबत आस्था नाही. विनोद तावडे सांस्कृतिकसह इतर नऊ खाते सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांची सांस्कृतिक क्षेत्रात लक्ष देण्याची मानसिकता नाही. या संस्था मोडकळीस आणण्याचे काम युती सरकार करीत आहे.
भाऊसाहेब भोईर स्वागत करताना म्हणाले की, देशात प्रथमच सहाशेहून जास्त कलाकारांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसते. महाराष्टाची संस्कृति जोपासण्यात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. राज्याचा प्रगतीचा आलेख उंचावत असताना सामाजिक भान ठेवून शरद पवारांनी सांस्कृतिक कला नाट्य क्षेत्राला चालना दिली. युती सरकारच्या काळातील सेन्सॉर बोर्ड म्हणजे सांस्कृतिक दहशतवादीच आहेत. सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे आहेत हाच एक विनोद आहे. आभार तेजश्री अडिगे यांनी मानले.