मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

रायगड : कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. हीी कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली.

संदीप रामकृष्ण पराडकर (वय 31, रा. रूद्रराज बिल्डींग, कामोठे) आणि वैभव विठोबा पाटील (वय 34, रा. कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली.

चरणदीपसिंग बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा), महेंद्र जगन्नाथ भोपी, विजय त्रिंबक चिपळेकर (नगरसेवक पनवेल मनपा) यांनी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी पोलिसांनी भा. द.वि. कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.