कादंबरी लिहीण्याचे अनेक फॉर्म्स असतात. गोष्ट सांगण्याची एक शैली असते. पण सिनेमा ही वेगळीच भाषा आहे. ती आजमितीस भारतात सर्वात जास्त कळालेला दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. साऊथचे ताकदीचे दिग्दर्शक देखील गावकुसाबाहेरचे सिनेमे अत्यंत ताकदीने दाखवतात. ते ही प्रतिमांचा वापर करतात.
पण सिनेमा हे शास्त्र जेव्हढे नागराज कोळून पिला आहे ते माझ्या पाहण्यात अन्य कुणी नाही. उदाहरण म्हणून कर्णन आणि असुरनशी याची तुलना करूयात. असुरनपेक्षा कर्णन मधे प्रतिकांचा वापर मुक्त आहे. प्रतिकांमधून दिग्दर्शक खूप खूप बोलला आहे. हे दृश्य असे अव्यक्त संभाषण आहे. पण गोष्ट मांडण्यासाठी कर्णन आणि असुरनकडे एक ताकदवान घटना आहे जिची कथा चित्रपटाचे सूत्र घट्ट पकडून ठेवते.
नागराजच्या झुंडची पटकथा आश्चर्यजनक आहे. तिला ठराविक अशी गोष्टच नाही. ज्यांनी हा चित्रपट फुटबॉल साठी झालेले ट्रान्सफॉर्मेशन म्हणून पाहिला त्यांना नागराज समजलेला नाही. काहींना तर हा सिनेमा डॉक्युमेण्टरी वाटला. या सर्वांचे शिक्षण होण्याची गरज आहे. म्हणूनच सुरूवातीला प्रश्न विचारला आहे कि,
नागराज सिनेमा कसा बनवतो ?
यात रिंकू राजगुरूचे एक पात्र आहे. मोनिका नाव असते तिचे. तिचे सिलेक्शन केले जाते. पण पत्ता शोधत आदिवासी पाड्यावर जावे लागते. यात बच्चन आयुष्यात पहिल्यांदा बैलगाडीत बसला असावा. बसंतीच्या टांग्यात बसला होता पण त्यात मऊ मऊ कापूस होता. बच्चन सारख्या सुपरस्टारला बैलगाडीत बसवण्याची किमया नागराजने केली आहे कारण त्याला ते दृश्य हवे होते. जिथे बैलगाडीच जाऊ शकते अशा ठिकाणी राहणार्या मोनिकाचे जग त्याला दाखवायचे होते.
इथे नागराजची चतुराई अशी कि त्याने मोनिका आणि तिच्या घरचे आपसात काय बोलतात ते आदिवासी भाषेत दाखवले आहे. त्याला जाणीवपूर्वक सबटाय़टल्स नाहीत. आवश्यकता नाही म्हणून ? छे ! त्याने हे सांगायचा प्रयत्न केला आहे कि ही महाराष्ट्रातच बोलली जाणारी भाषा आहे. ही भारतीय भाषा आहे. ही पण मराठी आहे. पण ही भाषा तुम्हाला समजत नाही. आणि तुमच्या अशा अपेक्षा आहेत कि तुमची प्रमाण भाषा या लोकांनी, जिथे बैलगाडी सुद्धा जात नाही, तिथे राहणा-यांनी शिकून कागदपत्रे जमा करावीत, तुमच्या डिजिटल इंडीयाच्या सेंटरवर पायपीट + बैलगाडी + एसटी अशा वाहनांनी यावे आणि स्वत:ला सिद्ध करावे. यांचे मेरीट नाही म्हणून शिमगा करणा-यांना हा संघर्ष किती पातळ्यांवर आहे हे दाखवण्याचा जो विस्तीर्ण पट आहे त्या चित्रपटाचे नाव झुंड आहे.
हा संघर्ष म्हणजे झुंड !!
हा संघर्ष दाखवण्यासाठी त्याने फूटबॉलच्या टीमच्या पात्रांची रचना अशी केली आहे कि ज्यातून त्याला जे जे सांगायचे आहे ते ते सर्व सांगता येईल. बारामतीच्या आमराईत अस्पृशोद्धार सोसायटी आहे. आताशा नाव बदलले आहे. गेली कित्येक वर्षे या वस्तीने पवारांना निवडून दिले. पण इथे आता आता पर्यंत डुकरं आणि गटारं वाहत होती. घरं आहेत पण रया गेली आहे. सार्वजनिक संडास आत्ता बांधले. नाहीतर घाणीचे साम्राज्य होते. बारामतीचा एसटी स्टॅण्ड ओलांडून पुढे येऊन वस्ती संपताना डाव्या बाजूला खाली उतरले की हे दृश्य दिसते. उजवीकडे हिरवीगार शेती. ऊस. मोठ मोठे बंगले. कोट्यवधींचा पैसा. बारामतीच्या एकेका पठ्ठ्याने पुणे मुंबईत जागा घेऊन ठेवल्यात. एकाने भोसरीत इंडस्ट्रीयल इस्टेट टाकली आहे. मॉल्सच्या जागा त्यांच्या आहेत. दुसरीकडे हे दृश्य आहे.
हे झुंड मधून एरीयल व्ह्यू ऎंगल ने दिसते. अनेक लॉंग शॉट्स मधून ते ठळक होत राहते. क्लोज शॉट्स मधून चेह-यावरचे भाव पकडत राहते. झोपडपट्टीत फिरताना लो अॅंगलने घाण आणि कचरा टिपत राहते. हा आहे सिनेमा. ही आहे सिनेमाची भाषा. सुधाकर रेड्डी आणि नागराज ही जोडी जणू काही एकमेकांसाठीच बनलेली आहे.
झोपडपट्टीचे वास्तव दाखवताना स्क्रीन वर रखरखीत दृश्ये येत राहतात. तेच डॉनची आयटेम दिसल्यावर झाडाची हिरवी पाने दिसतात. हे बारकावे फार दंग करुन टाकतात.
विजय बारसे सरांनी फुटबॉलची टीम बनवली आणि त्यांच्यात बदल केला ही एका सामान्य दिग्दर्शकाची पटकथा झाली असती. पण नागराज त्याच्या पुढे जातो. तो बारसे सरांना एकेका खेळाडूची माहिती विचारतो. त्याच्या डोक्यात आराखडा तयार होतो. पात्र तयार होतात. मग ही पात्र तो नागपूरच्या झोपडपट्टीतच शोधतो. हीच मुलं या सिनेमाला न्याय देतील म्हणून नागराज आणि त्य़ाचा भाऊ वस्तीत जाऊन फिरत राहतात. काही वेळा मुलं त्यांना पोलीस समजून पळत सुटतात. त्यांना आपलंसं करत सिनेमासाठी तयार करतो.
सर्वच पात्रांची कहाणी दाखवण्याची गरज नाही. पात्रांची कहाणी ही भारतातल्या सर्वच झोपडपट्ट्यांच्या संघर्षाची कहाणी आहे. बाकी नाजराज टच ठिकठिकाणी आहे. त्याबद्दल बोलूच आपण.
त्यापैकी एक म्हणजे कॉलेजमधून कचरा वस्तीत फेकला जातो पण वस्तीतल्यांना कॉलेजमधे प्रवेश नाही. हा विरोधाभास एकूणच शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक दरी यावर भाष्य करतो. जागतिक महासत्तेला आरसा दाखवतो.
डिजिटल इंडीयाचा बोर्ड, पहचान पत्र के लिए पहचान चाहीए हा डायलॉग.
क्रिमिनल रेकॉर्ड मुळे पासपोर्टच काय अनेका ठिकाणी नाकारली जाणारी संधी. हा एक वेगळ्या सिनेमाचा विषय आहे. नोकरीसाठी व्हेरीफिकेशन आले तर पोलीस पैसे मिळाल्याशिवाय पाठवत नाहीत. पो व्हे वेळेत आले नाही म्हणून संधी जाते. हे प्रकार अशा वस्तीच्या माथी असतात. सदाशिव पेठेत पोलिसाची हिंमत होत नाही. नोकरी जाईल त्याची.
फूटबॉलच्या मॅचसाठी लग्नातल्या वरातीसारखे सजून आलेले सैन्य.
संधी शोधण्यासाठी परदेशात गेलेला अमिताभचा मुलगा तिथे पहिलेच वाक्य ऐकून खजील होतो तो क्षण. मी परदेशात संधी शोधायला गेलो आणि बाबाने (वडीलांनी) घरात बसूनच आंतरराष्ट्रीय संधी निर्माण केली. हा भयंकर सकारात्मक भाग आहे. नागराज इथे सोल्युशन्स पण देतो.
मंत्र्याला इंटरनॅशनल स्लम सॉकर ऑलिंपिक काय असते हे ही ठाऊक नसणे. त्यासाठी सिलेक्शन होणे हे देशाचा गौरव आहे हे त्याच्या गावीही नसणे. कारण त्यात झोपडपट्टी हा शब्द आहे. झोपडपट्टी म्हणजे आपले नाही. तो देशाचा भाग नाही. तो इव्हेंट देशाचा सन्मान नाही हा त्याचा समज. मंत्र्याचाच नाही अनेकांचा हा समज आहे. तिथे आमिताभ बच्चन उठून येतो, फार बोलका प्रसंग आहे.
यात कुठेही ऑलिंपिकचे सामने दाखवलेले नाहीत. फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. नागराज स्टाईलने.
झुंडीकडे एक शिक्षक योग्य दृष्टीकोण ठेवून जरासे लक्ष काय देतो, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. एक खेळच नाही , विविध क्षेत्रात जर असे लक्ष दिले तर झोपडपट्ट्यातली अनेक मुले ही भिंत ओलांडतील.
हे झाले नागराजच्या सिनेमाचे ठळक बिंदू.
या निमित्ताने नागराजने न बोलता केलेले अनेक ठिकाणचे भाष्य सुजाण प्रेक्षकाला विचार करायला लावेल.
या निमित्ताने देवयानी खोब्रागडेचे स्मरण होते. तिला झालेली शिक्षा योग्य होती असे तावातावाने सांगणारे एन आर आय पब्लिक. देवयानी स्वत: एक लाख रूपये मिळवत असताना तिने मेडला साडेचार लाख रूपये द्यायला हवेत असे म्हणत होते. ही मंडळी भारतात मेडला मेट्रो सिटीत सहा हजार रूपये देतात कारण कायदा. देवयानी किमान ३०००० रूपये देत होती. आता तर प्रचंड महागाई झाली आहे.
जर अमेरिकेचे हे कायदे इथे आणले तर तुम्हाला भांडीवाली पाहीजे ना ? मग तिच्या घराची व्यवस्था करा हा कायदा केला पाहीजे. ड्रायव्हर पाहिजे ? त्याला रहायला रूम द्या किंवा क्वार्टरची व्यवस्था करा. सोसायटीने सोसायटीत येणा-या कामगारांसाठी जागेची व्यवस्था केली पाहीजे. असे झाले तर झोपडपट्ट्याच राहणार नाहीत.
इथे लोक इतके इंटरनॅशनल आहेत कि झोपडपट्टीत राहणा-यांबद्दल काय वाट्टेल ते बोलतात. पण आपल्या कामवालीला दीड हजार रूपये महिना देतात. या पैशात तिने काय नरीमन पॉईण्टला लाख रूपये भाडं भरून स्टुडीओ अपार्टमेण्ट घ्यायचं का ? तुमच्य़ा टाऊन प्लानिंगमधे कामगारांचे क्वार्टर्स हा कन्सेप्टच नाही. ज्याच्या घरी कामगार असेल त्याने सोसायटीला त्या क्वार्टरचे पैस भरावेत. कि नरीमन पॉईण्टला बावाजीकडे भांडी घासायला येणा-या ड्रायव्हरने खोपोलीवरून साडेसहाच्या ठोक्याला हजर रहायचे ? ते ही रात्री दीडपर्यंत साहेबाची सेवा केल्यावर ?
असे अनेक प्रश्न आहेत.
ऑनलाईन एज्युकेशन मधे महाराष्ट्रातल्या १२००० वाड्या वस्त्या आणि गावात नेटवर्क नसल्याचे समोर आले आहे. देशात हे प्रमाण प्रचंड आहे. यांचे जे नुकसान झाले त्याचे काय ? खासगी शाळेत महाग शिक्षण मिळत असताना सरकारी शाळा बंद केल्या आहेत. तिथे या धेंडांच्या शाळा येणार आहेत.
यात ज्यांची मुले शिकत होती ते सर्व जातीधर्माचे निम्न आर्थिक वर्गाचे लोक आहेत. ते सगळे बौद्ध नसतात. मुसलमान आहेत. मराठा आहेत. धनगर आहेत. सर्व आहेत. उच्चवर्णिय नावाला असतील.
या सर्वांचे म्हणणे नागराज मांडतो. त्यामुळे तो त्यांचा सिनेमा होऊन जातो. तो दणकून आपटला असा आनंदोत्सव करणारे भारतातून हाकलून दिले पाहीजेत. यांचा देशच नाही हा.
चित्रपटाच्या बाहेरच्या हटके बाबींवर उद्या बोलूयात. ते सुद्धा असेच ब्रिलियंट आहे.
हे कुठल्याच अर्थाने समीक्षण नाही. कारण झुंड पण नेहमीच्या पद्धतीचा चित्रपट नाही. इथून पुढे चित्रपट पाहण्याची सवय बदलावी लागेल हा संदेश झुंड देतोय. सिनेमा पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकाला प्रगल्भ व्हावे लागेल.
सांगायला आनंद वाटतो कि ज्यांच्या परीक्षणांकडे दृढ्ढाचार्य मंडळी कुत्सित नजरेने पाहत होती त्याच झुंड मधल्या पात्रांप्रमाणे असणा-या फेसबुकनगरीतल्या आंबेडकरनगरीला हा सिनेमा बरोब्बर समजला आहे. तो फूटबॉलची गोष्ट नाही हे अनेकांनी ओळखले आहे.