भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला

भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला

बीड (लोकमराठी) : कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना चहा देण्यात आला. मात्र, चहा प्लास्टिक मिश्रित कपात देण्यात आल्याची तक्रार एका पत्रकाराने केली. यावेळी कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

निवडणुकीत प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र याची पायमल्ली होत असतानाच, बीडच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

अकोल्यात भिंतीवरील थुंकी स्वत: केली साफ

आस्तिककुमार पांडे हे अकोल्याचे जिल्हाधिकारी होते, त्यावेळीही ते त्यांच्या हटके कामामुळे चर्चेत आले होते. आस्तिककुमार पांडे यांनी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अचानक भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयातील भिंती पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या होत्या. थुंकीने भरलेल्या भिंती आस्तिककुमार पांडे यांनी स्वत: साफ केल्या होत्या.