AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता
संग्रहित छायाचित्र

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक, मुळेवाडी, कोंभळी गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्यांचा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हप्ता पोहचत असल्याचे सांगितले जात आहे.

गावातच हात भट्टी, देशी विदेशी दारू उघडपणे मिळत असल्याने तरूण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. तर कौटुंबिक वाद, हिंसाचार वाढला असून बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे.

अहमदनगर पोलीस आणि हप्ता वसूली नवीन नाही. या आधी अहमदनगर पोलीसांची हप्ते वसूली चव्हाट्यावर आली होती. अवैध दारू विक्री होणारी (Chande Bk, Mulaywadi, Kombhali) ही गावे कर्जत पोलीसांच्या हद्दीत येत असून या अवैध धंद्यांवरून कर्जत पोलीस (Karjat Police), अहमदनगर एसपी ऑफीस (Ahmednagar SP Office) व राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी यांना दर महिन्याला हप्ता दिला जातो.

पोलीसांचा अवैध धंद्यांशी हितसंबंध

या दारू विक्रीबाबत कोणी तक्रार केल्यास त्या दारूच्या अंड्ड्यावर पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागातील इमानदार अधिकारी धाड टाकतात. मात्र, यातील काही भ्रष्ट कर्मचारी या धाडीची अगोदरच माहिती संबंधित धंदेवाल्यांना देतात. त्यामुळे धाडीत कोणताच मुद्देमाल मिळत आहे.

पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील इमानदार व कर्तव्यनिष्ठ अधिकारी तसेच कार्यक्षम लोकप्रतिनिधींनी याची तातडीने दखल घेऊन या गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी समस्त महिलांनी केली आहे.